होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात क्रांतिदिनी शिस्तबद्ध मोर्चाने आरक्षणासाठी एल्गार

जिल्ह्यात क्रांतिदिनी शिस्तबद्ध मोर्चाने आरक्षणासाठी एल्गार

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 09 2018 11:25PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूर, इचलकरंजी शहरांसह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यवहार अभूतपूर्व असे कडकडीत बंद होते. दरम्यान, ‘आरक्षण आमच्या हक्‍काचे.. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..’  अशा घोषणा देत, हातात भगवे झेंडे घेऊन रस्त्यांवर उतरलेला मराठा समाजाचा जनसागर, असे सार्वत्रिक चित्र होते. ठिकठिकाणी मोर्चे काढून समाज बांधवांनी एकीची वज्रमूठ दाखवून दिली.  

इचलकरंजीत मराठा झंझावात

इचलकरंजीच्या आसपासच्या गावांतील समाजबांधव सकाळी मोटारसायल रॅलीद्वारे इचलकरंजीत दाखल होत होते. 11 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात युवकांचे जथ्थेच्या जथ्थे येत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तसेच आरती करण्यात आली. त्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला.

मोर्चात आबालवृद्धांसह मोठ्या संख्येने तरुणवर्गाने सहभाग घेतला होता. शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा मार्गस्थ होत होता. मोर्चा शिस्तबद्ध व्हावा यासाठी स्वयंसेवकही प्रयत्न करीत होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कॉ. मलाबादे चौक या प्रमुख मार्गांवरून मोर्चा महात्मा गांधी पुतळा परिसरात आला. या ठिकाणी क्रांती स्तंभास ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन मोर्चा विसर्जित झाला. दरम्यान, शहरातील प्रांत कार्यालय चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणीही समाज बांधवांनी हजेरी लावली.

जयसिंगपुरात भगवे वादळ

जयसिंगपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणप्रश्‍नी बंदमुळे जयसिंगपूर शहर गुरुवारी भगवे झाले होते. शहर व परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहिले. सकल मराठा समाज बांधवाच्या मानवी साखळीने सांगली-कोल्हापूर महामार्ग ठप्प राहिला. ‘या सरकारचं करायचं काय-खाली डोकं वर पाय,’ अशा घोषणांनी परिसर दणाणला. दुपारी साडेतीन वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून आंदोलकांनी घोषणा देत पदयात्रा काढली. 

हातकणंगलेत चक्‍काजाम

हातकणंगले : प्रतिनिधी 
हातकणंगले येथे कोल्हापूर-सांगली महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हातकणंगले येथे सलग 14 दिवसांच्या ठिय्या आंदोलनानंतर गुरुवारी 15 व्या दिवशी आयोजित चक्‍काजाम आंदोलनाला मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 12 वाजता सुरू झालेले चक्‍काजाम आंदोलन 5 वाजता समाप्‍त करण्यात आले. यावेळी जवळपास दहा हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.

सहनशीलतेचा अंत पाहू नका
आजरा ः प्रतिनिधी
बंदला आजरा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. तर, एस. टी., रिक्षांसह अन्य वाहनधारक व्यावसायिकांनी बंद पाळून पाठिंबा दर्शविला. आंदोलकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून मोर्चाने येऊन संभाजी चौकात चक्‍काजाम आंदोलन केले. दरम्यान, तालुक्यातील उत्तूर, मडिलगे, सुळेरान व शिरसंगी ग्रामस्थांनीही रास्ता रोको करून आंदोलनास पाठिंबा दर्शविला.

चंदगडला कडकडीत बंद
चंदगड ः प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. पाटणेफाट्यावर आंदोलक गाई, म्हशी घेऊन आले होते. तर, हलकर्णीफाट्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. चंदगडातही मोटारसायकल रॅली काढण्यात आली. होसूर येथे रस्त्यावर टायरी पेटवण्यात आल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून चंदगड आगारानेही संपूर्ण दिवस बस सेवा बंद ठेवली होती. त्यामुळे तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होतो. पाटणेफाटा येथे झालेल्या सभेत मंत्र्यांना व आमदारांना चंदगड तालुक्यात फिरू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला. 

गडहिंग्लजला हजारोंचा जनसमुदाय रस्त्यांवर
गडहिंग्लज ः प्रतिनिधी
आरं ह्यो मोर्चा कसला हाय... मराठ्यांचा हाय.. मराठ्यांचा हाय... अशा गगनभेदी घोषणा देत गडहिंग्लज शहर दुमदुमून सोडत गुरुवारी गडहिंग्लजला विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवती यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात झाल्याने या मोर्चाला आणखीन भव्यता आली. सकाळी साडेदहाला सुरू झालेला मोर्चा साडेबाराच्या सुमारास संपला. अत्यंत शांतता व शिस्तबद्धतेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता केवळ घोषणाबाजी करीत हा मोर्चा पार पडला. दसरा चौकातून महामोर्चाला प्रारंभ झाला. हातात पेटत्या मशाली घेऊन मराठा समाजाच्या भगिनी मोर्चाचे नेतृत्व करीत होत्या. तर शिवबांच्या वेशातील लहानसा बालक अश्‍वारूढ होऊन समस्त समाजाचे नेतृत्व करीत होता. अत्यंत शांततेत संपूर्ण शहरातून हा मोर्चा काढण्यात आला.  शिवाजी चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा मोर्चा दसरा चौकात आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याचा निषेधार्थ काही कार्यकर्त्यांनी तिरडी मोर्चा काढला. 

जेलभरोसाठी दहा हजार मराठा बांधव कचेरीवर
गारगोटी ः प्रतिनिधी
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला गारगोटीसह भुदरगड तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जेलभरो आंदोलनासाठी सुमारे दहा हजार लोकांनी कचेरीवर धडक मारली. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बोंब ठोकली व शासनाचा निषेध केला. आक्रमक झालेल्या आंदोलकापुढे प्रशासन मात्र हतबल झाल्याचे दिसत होते.

हुतात्मा क्रांती ज्योतीस अभिवादन करून बंद आंदोलनास प्रारंभ झाला. तालुक्यातील विविध गावांतून जथ्येच्या जथ्ये येऊ लागले. दुपारी 12 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले. त्यानंतर गारगोटी मुख्य बाजारपेठेतून सुमारे 15 हजारांच्या रॅलीला सुरुवात झाली. आंदोलकांनी ‘आम्हाला अटक करा,’ असे म्हणत थेट भुदरगड कचेरीत धडक मारली. सुमारे दहा हजार आंदोलकांनी अचानक धडक मारल्यामुळे प्रशासन हतबल झाले. यावेळी जमावाने शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. कचेरीतून आंदोलक पुन्हा आंदोलनस्थळी परतले. या ठिकाणी दोन मिनिटे स्तब्धता पाळून शासनाला श्रद्धांजली वाहिली. 

कागलमध्ये कडकडीत बंद
कागल : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला कागलमध्ये उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्यात आला. कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यवहार पूर्णपणे बंद होते. बंदच्या दरम्यान शहर तसेच परिसरात भगव्या टोप्या आणि झेंडे यांनी संपूर्ण परिसर फुलून गेला होता. सर्व मराठा बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता, तर सर्व समाजांचे बांधव त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले होते.

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चालत रॅली काढली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. यामध्ये डॉक्टर, व्यापारी, वकील, शिक्षक व सर्व घटकांतील बांधव सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आल्यानंतर रॅलीचे रूपांतर गणेश मंदिरासमोर सभेत करण्यात आले. 

मुरगूडला मुंडण; टायर पेटवल्या 
मुरगूड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणसंदर्भात गुरुवारी मुरगूड व परिसरात जोरदार निदर्शने करत युवकांनी मुंडण करून रस्त्यावर टायर पेटवून व मोर्चा काढून राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यासंदर्भात पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुरगूडमध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील शाळा, महाविद्यालयांबरोबरच व्यापार्‍यांची दुकाने व सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.

केतन तिरोडकरच्या पुतळ्याचे दहन

मराठा आरक्षणच्या विरोधात याचिका दाखल करणारे केतन तिरोडकर याच्या निषेधाच्या घोषणा देत सकल मराठा समाजाने केतन तिरोडकरला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी करत त्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे भर चौकात दहन करण्यात आले. यावेळी आरक्षणाला विरोध करणार्‍यांच्या विरोधात तीव्र उद्रेक होईल, असा इशारा देण्यात आला.