Sat, Nov 17, 2018 20:42होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात दगडफेक; पोलिसांचा सौम्य लाठिमार (व्हिडिओ)

कोल्हापुरात दगडफेक; पोलिसांचा सौम्य लाठिमार (व्हिडिओ)

Published On: Jan 03 2018 11:59AM | Last Updated: Jan 03 2018 5:08PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

भीमा-कोरेगाव प्रकरणाचे तीव्र पडसाद आज, कोल्हापुरात उमटले. शहरात काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून, प्रामुख्याने एसटी बसला लक्ष्य करण्यात आले आहे. आंदोलकांनी शहराच्या काही भागात सुरू असलेली दुकाने बंद करायला लावली. सकाळपासूनच शहरात दुकाने उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली होती. विशेषतः महाद्वार रोड, जोतिबा रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी येथील दुकाने बंदच होती. काही दुकाने अर्धी उघडी ठेवण्यात आली होती. मात्र, आंदोलनकांनी ती बंद करायला लावली. 

शहरातील परिवहन सेवा केएमटी सकाळच्या सत्रात सुरू होती. पुढच्या काचेवर जाळ्या लावून सकाळी केएमटी धाव होत्या. मात्र, काही वेळाने त्या बंद करण्यात आल्या. राजारामपुरी येथे केएमटीवर दगडफेक करण्यात आली. तर व्हीनस कॉर्नर येथे एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरात गोकुळ हॉटेलवरही दगडफेक करण्यात आली आहे. यासह ग्रामीण भागातही आंदोलनाची तीव्रता असून, कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

काही ठिकाणी दोन गट आमने-सामने आल्याने अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आले आहे.