कोल्हापूर : प्रतिनिधी
करवीरनिवासिनी महालक्ष्मी देवीस खास म्हैसूरहून हत्ती मागविण्यात आला होता. तो महालक्ष्मीच्या सेवेत रुजू होता. या संदर्भातील इसवी सन 1810 मधील पत्र. श्रीपूजा, नैवेद्य, नंदादीप महोत्सव यथास्थित चालावा यासाठी मौजे उचगाव या गावाचे उत्पन्न छत्रपती व घोरपडे यांनी दिले होते. या संदर्भातील इसवी सन 1775 चे पत्र यासह करवीर निवासिनी महालक्ष्मी संदर्भातील मोडी कागदपत्रात लपलेल्या अनेक गोष्टी प्रकाशात येत आहेत.
करवीर निवासिनी महालक्ष्मी संदर्भातील मोडी कागदपत्रे या विषयावर संशोधन आणि ग्रंथनिर्मितीचे काम इतिहास अभ्यासक उदयसिंह मानसिंगराव राजेयादव हे करत आहेत. या संदर्भात यापूर्वी दोन खंड प्रसिद्ध झाले असून तिसरा खंड इतिहासप्रेमींसाठी तयार झाला आहे. यात एकूण 51 कागदपत्रांचा समावेश असून त्याचा कालखंड इसवी सन 1700 ते 1896 असा आहे.
करवीरकर छत्रपती संभाजी महाराज, घोरपडे सरकार यांनी दिलेल्या सनदा, हुक्केरी, मौजे भेंडवडे, कसबा कापशी, पट्टणकोडोली, इचलकरंजी, मौजे चोकाक, रुकडी, कबनूर या गावांत श्रीपूजकांना उत्पन्नासाठी जमिनी दिल्याची इनामपत्रे, धर्मादाय इनाम, नवरात्र उत्सवासाठी नरहरी भट सागावकर यांना देवीच्या पूजा-अर्चासाठी दिलेले अधिकार अशा गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय घोरपडे घराण्यातील सुबराव घोरपडे, मुरारराव घोरपडे, दौलतराव घोरपडे, हिंदुराव व भुजंगराव घोरपडे अशा व्यक्तींचे पत्रव्यवहार, हस्ताक्षरे याबाबतची माहितीही इतिहासप्रेमींना मिळणार आहे.