होमपेज › Kolhapur › एमपीएससी : कोल्हापूरचा झेंडा

एमपीएससी : कोल्हापूरचा झेंडा

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 31 2018 1:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत कोल्हापूरच्या ऐश्‍वर्या गिरी या तहसीलदार पदासाठी एन.टी.बी. प्रवर्गातून महिला वर्गात राज्यात प्रथम आल्या. तर श्रीधर पाटील हे राज्यात पाचवे आले. कोल्हापूरसह सांगली, सातारा व सोलापुरातील विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत चांगले यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांवर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होत होता.राज्यात पहिल्या आलेल्या ऐश्‍वर्या गिरी या शिवाजी पेठ येथील रहिवाशी आहेत, तर श्रीधर पाटील हे टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील राहणारे आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे : राजश्री संपतराव देसाई (नगर परिषद, चीफ ऑफिसर, रा. कळे, ता. पन्हाळा), समरजित बळवंत पाटील (डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, रा. कपिलेश्‍वर, ता. राधानगरी) हे राज्यात 6 वे आले आहेत.जळगाव जिल्ह्यातील रोहितकुमार राजपूत हे सर्वसाधारण गटातून राज्यात प्रथम, तर सोलापूर जिल्ह्यातील अजयकुमार नष्टे मागासवर्गातून आणि महिला वर्गवारीतून पुण्याच्या रोहिणी नर्‍हे यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.या निकालात उपजिल्हाधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, वित्त व लेखा विभागासाठी सहसंचालक, सहआयुक्‍त सेल टॅक्स, मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, सहनिबंधक अशा 26 महत्त्वाच्या पदांचा समावेश असल्याची माहिती आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.

आयोगाच्या वतीने गेल्या सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्या अगोदर एप्रिलमध्ये मुंबईसह 37 जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेला राज्यभरातून 1 लाख 98 हजार 599 विद्यार्थी बसले होते. यातून 4 हजार 839 उमेदवार मुख्य परीक्षेला पात्र झाले होते. यातून अंतिम मुलाखतीसाठी गेलेल्या 1 हजार 194 उमेदवारांपैकी 377 पदांचा निकाल जाहीर केला असल्याचे आयोगाने म्हटले आहे.