होमपेज › Kolhapur › परीक्षार्थींच्या वाट्याला सामाजिक हेटाळणी!

परीक्षार्थींच्या वाट्याला सामाजिक हेटाळणी!

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 09 2018 12:32PMकोल्हापूर : सुनील कदम

स्पर्धा परीक्षार्थींबद्दल कुटुंब आणि समाजाकडूनही अपेक्षा वाढलेल्या असतात. मात्र, वर्षानुवर्षे काबाडकष्ट करूनसुद्धा लाखो स्पर्धा परीक्षार्थी केवळ शासनाच्या उदासीन धोरणांमुळे आपले अपेक्षित ध्येय गाठण्यात अपयशी ठरत आहेत. त्याचा परिणाम म्हणून या परीक्षार्थींच्या वाट्याला एकप्रकारची सामाजिक आणि कौटुंबिक हेटाळणी येताना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून आधीच धास्तावलेल्या या युवा पिढीचे आणखीनच खच्चीकरण होताना दिसत आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून या स्पर्धा परीक्षार्थींच्या पायात जणूकाही शासकीय धोरणांचा लोढणा अडकलेला आहे. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या खात्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षा कधी लांबणीवर पडताना दिसताहेत, तर कधी रद्दच होताना दिसताहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींच्या आयुष्याची ध्येयपूर्तीसुद्धा शासकीय धोरणांनुसार दोलायमान होताना दिसत आहे.

सहसा पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेनंतर अनेकजण स्पर्धा परीक्षेची पायरी चढायला सुरुवात करतात. स्पर्धा परीक्षार्थींची पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेपर्यंतची वीस-बावीस वर्षे आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी घालवलेली किमान चार-पाच वर्षे, अशी आयुष्यातील जवळपास तीस वर्षे म्हणजे साधारणत: निम्मे आयुष्य आपल्या अपेक्षित ध्येयपूर्तीसाठी खर्ची पडलेले असते. आता आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्या पाल्याने किमान अपेक्षित जबाबदारी उचलावी, अशी पालकांची अपेक्षा असते. मात्र, अपेक्षित ध्येय साध्य करायला येत असलेल्या अडचणी, अशा कात्रीत हा वर्ग सापडलेला दिसतो. आजकाल तर स्पर्धा परीक्षार्थींकडे बघण्याचा कुटुंबीयांचा द‍ृष्टिकोनसुद्धा काहीसा कलुषित झालेला दिसून येतो. अर्थात, याला मोठ्या प्रमाणात शासकीय धोरणे कारणीभूत असली, तरी त्याचा विचार न करता या सगळ्याचे खापर मात्र आपसूकच स्पर्धा परीक्षार्थींवर फुटताना दिसत आहे. 
 

संबंधित : 

पात्रता ‘आचार्या’ची, शासनकृपेने झाला ‘आचारी’!

मध्यप्रदेशच्या ‘व्यापम’ची महाराष्ट्रात पुनरावृत्ती?

सरस्वतीच्या लेकरांचा ‘भाकरी’साठी आक्रोश!