Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Kolhapur › पहिल्या उचलीसाठी ‘स्वाभिमानी’चे पुन्हा रणशिंग

पहिल्या उचलीसाठी ‘स्वाभिमानी’चे पुन्हा रणशिंग

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 1:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी

हंगामाच्या सुरुवातीलाच कारखानदार, शेतकरी संघटना, सरकार यांच्यातील बैठकीत ठरल्याप्रमाणे विनाकपात पहिली उचल येत्या 15 दिवसांत द्या, अन्यथा गनिमी काव्याने आंदोलनाचा भडका उडवून फिरणेही मुश्किल करू, असा गर्भित इशारा देत खा. राजू शेट्टी यांनी साखर कारखानदार व राज्य सरकारच्या विरोधात लढ्याचे पुन्हा एकदा रणशिंग फुंकले. साखरेचे दर पाडण्याचे कारस्थान रचले असल्याने गेल्या दोन महिन्यांतील साखर खरेदी-विक्रीची चौकशी करावी, अशी मागणी ईडी, सेबी व इन्कमटॅक्स अधिकार्‍यांची भेट घेऊन करणार आहे. त्यांनीही मनावर घेतले नाही, तर त्यांच्यावरही चाल करून जाऊ, अशी घोषणाही खा. शेट्टींनी केली.

कारखानदारांनी परस्पर कपात केलेली पहिली उचल विनाकपात द्यावी, या प्रमुख मागणीसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी दसरा चौकातून साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. साखर सहसंचालक कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर तेथेच ट्रॉलीमध्ये उभारलेल्या व्यासपीठावरून खा. शेट्टी यांनी ऊस दराच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग फुंकले. यावेळी सरकारच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी पोलिसांच्या कड्यात व्यासपीठावर येऊन संघटनेकडून निवेदन स्वीकारले.

आमचे कारखानदारांशी भांडण नाही; पण फसवले तर नरड्यावर पाय ठेवून वसूल करण्याची ताकद मनगटात असल्याचे सांगत, खा. शेट्टी यांनी भाषणाला सुरुवात केली. सर्किट हाऊसमधील बैठकीत पहिली उचल ठरलेली असतानाही साखरेचे दर पडल्याचे सांगत कारखानदारांनी 500 रुपये कपात केली. कट करावा त्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली, सोलापुरातील कारखान्यांनी तातडीने अंमलबजावणी केली, हे संशयास्पद आहे. सरकार साखर कारखानदारांच्या चार संस्थांकडून येणार्‍या माहितीवर धोरणे ठरवत असल्याने या संस्थांचे आकडे सोयीने बदलतात. कारखान्यांचा फायदा होणार असेल तर आकडे फुगवले जातात, तर इंटरेस्ट नसेल तर कमी दाखवले जातात. हे रतन खत्रीचे आकडे काढणे आधी बंद केले पाहिजे. खोटे आकडे सांगून फसवायचा प्रयत्न करू नका, असेही खा. शेट्टी यांनी ठणकावले. आता निरोप द्यायला आलोय, पुढल्यावेळी जप्तीच्या नोटिसा घेऊनच कार्यालयात घुसणार. कायद्याप्रमाणे वर्तन न केल्यास तुम्हालाही उचलून नेऊ, असा इशारा खा. शेट्टी यांनी साखर सहसंचालकांना दिला.

मध्यस्थी केली, आता मुकाट्याने मिटवायचे

पहिली उचल ठरवण्यासाठी मध्यस्थ म्हणून मध्ये पडलात, आपणच तोडगा काढल्याची शंभरभर पोस्टर झळकवली. आता मोठेपणा घेतला म्हटल्यावर एफआरपी मोडत असताना गप्प का, असा खणखणीत सवाल खा. शेट्टी यांनी पालकमंत्री पाटील यांना केला. मध्यस्थी केलीच आहे, तर आता मुकाट्याने येऊन मिटवायचे, नाही तर तुम्हालाच कायद्याचा बडगा आणि शेतकर्‍यांचा तडाखा दाखवू, असा इशाराही दिला. प्रा. जालंदर पाटील यांनीही ना. पाटील यांचा समाचार घेताना भूमिपुत्र म्हणून कारखानदारी सावरणे तुमची नैतिक जबाबदारी होती, 15 दिवसांत ठरल्याप्रमाणे कारखान्यांनी पैसे जमा केले नाहीत, तर तुमच्या घरावर मोर्चा काढून तुम्हाला आठवण करून दिली जाईल, असे जाहीर केले. सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी ना. पाटील यांच्यावर निशाणा साधत, तुम्हीच ठरवले आहे आता तुम्हीच निस्तरायचे. नाही तर सांगलीत पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही दिला.

सांगलीचे सयाजी मोरे यांनी, शेतकर्‍यांच्या घामावर दरोडा घालणार असाल, वाटमारी करणार असाल, तर हा स्वाभिमानीचा छावा 2019 मध्ये तुमची वाट अडवल्याशिवाय, तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा दम भरला.

मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकासकाका पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चासाठी सहभागी झाले होते. एफआरपी अधिक 200 रुपये जादा मिळालेच पाहिजेत अशा घोषणा सुरू होत्या. मोर्चा साखर सहसंचालक कार्यालयासमोर नेण्यात आला. या ठिकाणी जाहीर सभा झाली.

मोर्चात जिल्हा परिषदेच्या सभापती शुभांगी शिंदे, माजी सभापती सुवर्णा अपराध, जयकुमार कोले, सयाजी मोरे, विकास देशमुख, रमेश भोजकर, वैभव कांबळे, आप्पासाहेब चौगुले यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.