Wed, Jul 17, 2019 12:08होमपेज › Kolhapur › महावितरणच्या आडून भाजप सरकारचा खोटा कारभारः सतेज पाटील 

महावितरणच्या आडून भाजप सरकारचा खोटा कारभारः सतेज पाटील 

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 10:36PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महावितरणच्या माध्यमातून जास्तीचे पैसे गोळा करण्याचे काम भाजप सरकारकडून केले जात आहे. खुद्द ऊर्जामंत्र्यांनीच खोटी बिले दिल्याचे सभागृहात मान्य केले आहे. शेतकर्‍यांच्या सबसिडीसाठी दोन रुपये दर वाढवावा लागत असल्याचे उद्योजकांना एका बाजूला सांगायचे, तर दुसर्‍या बाजूला खोटे युनिट दाखवून शेतकर्‍यांनी एवढी वीज वापरली म्हणून सांगत सबसिडी उचलायची, असा धंदा सध्या जोरात सुरू आहे. या खोट्या बिलांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम भाजप करत असल्याची टीका आ. सतेज पाटील यांनी केली. 

वीज दरवाढीसह प्रलंबित वीज कनेक्शन जोडणीच्या मागणीसाठी काँग्रेस व इरिगेशन फेडरेशनतर्फे महावितरणवर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी साडेबाराला दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, अजिंक्यतारा मार्गे महावितरणवर येऊन थडकला. मोर्चाचे ताराबाई पार्कातील महावितरणच्या कार्यालयासमोरच जाहीर सभेत रूपांतर झाले. 

यावेळी आ. पाटील यांनी विजेच्या प्रश्‍नावरून शेतकरी, घरगुती व औद्योगिक ग्राहकांच्या व्यथा मांडत भाजप सरकारच्या आदेशाने महावितरणकडून सुरू असलेल्या गैरकारभाराचे वाभाडे काढले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी हिंमत असेल तर मंत्रालय रात्री 12 ते 8 चालवून दाखवावे, असे आव्हान दिले. सत्यशोधन समितीचा अहवालही शासनाने दाबून ठेवला आहे. तो आजपर्यंत पटलावर का आला नाही, अशी विचारणा करत आमदार पाटील यांनी ‘तुम भी खाओ, मै भी खाऊ’ असा सरकार व महावितरणचा कारभार आहे, अशी टीका केली.

•प्रमुख मागण्या : वीज दरवाढ मागे घ्यावी, जिल्ह्याला भारनियमनातून वगळावे, सत्यशोधन समिती अहवालानुसार खरा वीज वापर निश्‍चित करावा, पोकळ थकबाकी रद्द करावी, कृषी संजीवनीत दंड व्याजात सूट द्यावी, वीजवापर वाढवून होणारी बिल आकारणी थांबवावी, शेतीपंप परवाने तत्काळ द्या, डीडीएफऐवजी एनडीडीएफ योजना पूर्ववत करावी, दिवसा 10, रात्री 12 तास अखंड वीज द्या, वीज साहित्याचा बोजा शेतकर्‍यांवर टाकू नये, गुर्‍हाळघरांना दिवसा वीजपुरवठा करावा.