Sun, Jan 20, 2019 00:33होमपेज › Kolhapur › ...म्‍हणून गुळाला मुंगळे चिकटले आहेत : आमदार क्षीरसागर

...म्‍हणून गुळाला मुंगळे चिकटले आहेत : आमदार क्षीरसागर

Published On: Jun 23 2018 1:57AM | Last Updated: Jun 23 2018 1:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भाजपकडे सत्ता असल्यानेच गुळाला मुंगळे डसले आहेत. शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होत असून माझ्याविरोधात सगळे असले तरी जिल्ह्यात आठ आमदार निवडून आणून दाखविणार असल्याचे आ. राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी जाहीर केले. 

फी वाढ व डोनेशनविरोधात सरकारला जाग आणण्यासाठी शुक्रवारी (दि. 22) शिक्षण उपसंचालक कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आ. क्षीरसागर म्हणाले, प्रत्येक कार्यकर्ता हा शिस्तीतून घडलेला असून तो पक्षप्रमुखांकडे अडचणी मांडतो. पद मिळाले नाही म्हणून कोणी नाराज नाही. आगामी निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जाहीर केले. यास खीळ बसावी म्हणून आमदार नाराज असल्याच्या बातम्या विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. काही लोकांना सत्तेशिवाय जमत नाही, त्यामुळे सत्तेला मुंगळे चिटकले आहेत. सत्ता गेल्यावर सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर प्रेम होते. सहापैकी पाचवेळा शिवसेनेचा आमदार जनतेने निवडून देऊन सर्वाधिक यश दिले आहे. 2014 च्या निवडणुकीवेळी भाजपने युती तोडली. महाराष्ट्रात पंतप्रधानांपासून खासदार, मंत्र्यांच्या सभा झाल्या; परंतु शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पक्षावर नियंत्रण असून महाराष्ट्रावर त्यांचे लक्ष आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षहिताचा असेल, असे ते म्हणाले. 

स्वार्थासाठी आपणास मंत्रिपद नको आहे. साडेआठ वर्षांत जनतेची कामे केली आहेत. लिमिटेड मंत्री पदे असताना पक्षप्रमुख कोणा-कोणाला न्याय देणार याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात 15 आमदार निवडून आणण्यासाठी मंत्रिपद हवे आहे, असे आ. क्षीरसागर म्हणाले.