Sat, Jan 19, 2019 09:35होमपेज › Kolhapur › समन्वयक मंत्र्यांनी कानडीचे गोडवे गाणे निषेधार्ह 

समन्वयक मंत्र्यांनी कानडीचे गोडवे गाणे निषेधार्ह 

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 23 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादासाठी राज्य सरकारने नियुक्‍त केलेले समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कानडी संस्कृतीचे गोडवे गाणे निषेधार्ह आहे, असा हल्लाबोल आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. मराठी भाषिक असणार्‍या सीमा बांधवांसाठी जो महाराष्ट्र लढतोय त्या लढ्याला यामुळे ठेच पोहोचली असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.

गोकाक तालुक्यातील तवग (जि. बेळगाव) येथील एका कार्यक्रमात ना. पाटील यांनी काही ओळी कन्‍नड भाषेत वाचून दाखविल्या. जन्मले तर कर्नाटकातच जन्मावे, असा त्याचा अर्थ होत असल्याने हे सीमालढ्याला समर्पक ठरत नसल्याचा आरोप आ. क्षीरसागर यांनी केला. ते म्हणाले, ना. चंद्रकांत पाटील सीमालढ्याचे समन्वयक मंत्री म्हणून महाराष्ट्राकडून काम पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. असे असताना त्यांच्याकडून कन्‍नड संस्कृतीचे गोडवे गाणे याचा मी निषेध करतो. सीमाभागातील मराठी भाषा आणि मराठी माणूस अनेक वर्षांपासून अन्याय, तसेच मारहाण सहन करीत असताना जन्मावे तर कर्नाटकातच, असे बोलून मराठीचा द्वेष करणार्‍यांसमोर लोटांगण घालणे ना. चंद्रकांत पाटील यांना शोभत नाही. आपले मंत्रीच असे म्हणत असतील, तर सीमा प्रश्‍न सुटणार कसा, हा मोठा प्रश्‍न आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रमोद नवलकर यांच्यासह अनेकांनी याच प्रश्‍नावरून कर्नाटकमध्ये जेलची शिक्षा भोगली आहे. संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीवेळी 69 शिवसैनिक हुतात्मे झाले आहेत. आजही सीमाभागातील मराठी बांधवांबरोबर शिवसेना कायम आहे, असे आ. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.