Tue, Mar 19, 2019 15:34होमपेज › Kolhapur › एमबीबीएस अभ्यासक्रम बदलणार?

एमबीबीएस अभ्यासक्रम बदलणार?

Published On: Aug 12 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 1:14AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

कालबाह्य आजारांची माहिती आणि पुस्तकी ज्ञानावर भर, अशा स्वरूपामुळे अपरिपूर्ण असा शिक्‍का बसलेला देशातील वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलतो आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने देशातील वैद्यकीय क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, लवकरच हा नवा अभ्यासक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची सुरुवात 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असून, आता वैद्यकीय शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष रुग्ण हाताळणी करण्याची संधी मिळणार आहे.

जगाच्या आरोग्य विज्ञान क्षेत्रामध्ये गेल्या चार दशकांत अनेक बदल झाले आहेत. जागतिक तापमान वाढ, प्रदूषणाची वाढती पातळी, बदलती जीवनशैली आणि पर्यावरणातील बदल यामुळे नवनवीन आजार समोर येत असताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाने अनेक जुन्या कालबाह्य आजारांवर मातही केली आहे. यानुसार देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होण्याची आवश्यकता होती.

परंतु, प्रत्यक्षात मात्र अनेक आजार बळावूनही त्यांच्या उपचाराची परिपूर्ण माहिती अभ्यासक्रमामध्ये नाही आणि ज्यांची गरज उरली नाही, असे आजार व उपचार पद्धतीचा अभ्यासक्रमामध्ये समावेश तसाच ठेवण्यात आला. याखेरीज रुग्ण हाताळणीचा प्रत्यक्ष अनुभव कमी असल्यामुळे पदवीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्याला रुग्णाला सलायन लावता येत नाही, अशा काही घटनांनाही सामोरे जावे लागत होते. यामुळे रुग्णसेवेवर थेट परिणाम होत असल्याने केंद्रीय पातळीवर त्याचा गांभीर्याने विचार सुरू होता. त्याचा वेध घेऊन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने नवा अभ्यासक्रम तयार केला. या अभ्यासक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मंजुरीचा हिरवा कंदील दाखविल्यानंतर या नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

जागतिक शिक्षणामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम कालानुरूप तत्काळ बदलण्याची प्रथा जुनी झाली असली, तरी भारतामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम तब्बल 21 वर्षांनंतर आपली कात टाकतो आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून या नवीन अभ्यासक्रमाबाबत देशभरातील 40,000 शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यानंतर या प्रशिक्षण दिल्या जाणार्‍या शिक्षकांकडून इतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सध्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रचलित अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना रुग्ण हाताळणीची संधी मिळत नाही. दुसर्‍या वर्षी ती पुसटशी तर तिसर्‍या वर्षी रुग्ण हाताळणीचा खर्‍या अर्थाने श्रीगणेशा होतो. त्याचबरोबर एका रोगाची माहिती आणि उपचार पद्धती यांचे शिक्षण विविध विषयांतर्गत त्रोटकपणे शिकविले जात असल्याने या पद्धतीत सखोल ज्ञानाचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता. ही त्रुटी लक्षात घेऊन आता नव्या अभ्यासक्रमात पहिल्या वर्षापासून रुग्ण हाताळणीसोबत एकात्मिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच जुन्या कालबाह्य रोग आणि उपचार यांची माहिती वगळून आता वैद्यकीय क्षेत्रासमोर असलेल्या नव्या आव्हानांची माहिती आणि उपचार पद्धती यांचा समावेश करण्यात आला आहे.