होमपेज › Kolhapur › कमी प्रतीच्या दूध खरेदी दरात कपात

कमी प्रतीच्या दूध खरेदी दरात कपात

Published On: Aug 24 2018 12:51AM | Last Updated: Aug 24 2018 12:48AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

गायीचे कमी फॅट व एसएनएफच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 30 पैशांऐवजी एक रुपये कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूर्वी हे दूध स्वीकारले जात नव्हते; नव्या आदेशाने ते दूध संघांना स्वीकारावे लागणार आहे. 

गायीचे दूध अतिरिक्त झाल्याने संघांनी या दूध खरेदी दरात मोठी कपात केली होती. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन केल्यानंतर शासनाने 20 जुलै रोजी सहकारी व खासगी संघांना दूध भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये तर दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ दुधाला अटीच्या अधिन राहून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. यासंदर्भात 31 जुलै रोजी सुधारित आदेश काढले. 

या आदेशात 3.5 फॅट व 8.5 एसएनएफपेक्षा कमी प्रतीच्या दूध खरेदीबाबत कोणताही उल्लेख नव्हता. याबाबत दूध भेसळीला आळा बसावा व फॅटबरोबरच एसएनएफ साठीसुद्धा प्रतिलिटर काही रक्कम कपात करणे आवश्यक असल्याचे सहकारी व खासगी दूध संघांनी शासनाला कळवले. त्यानुसार गाय दुधाची प्रत उत्तम रहावी, त्यासाठी राज्यातील पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधाच्या प्रती 1 पॉईंट कमी एसएनएफकरिता खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयांची कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याच दरात शासनाच्या प्रती लिटर पाच रुपये अनुदानाचा समावेश असणार आहे.