Wed, May 22, 2019 15:16होमपेज › Kolhapur › दक्षिणेतील ‘मतांसाठी’ महापालिकेचा ‘तोटा’

दक्षिणेतील ‘मतांसाठी’ महापालिकेचा ‘तोटा’

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 10:42PMकोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील तब्बल अडीचशे एकर जागा महापालिका हद्दीत असल्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे तेथील अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला. परंतु, महापालिकेला ही मोक्याची जागा मिळण्यात केवळ ‘मतांचे राजकारण’ आडवे येत आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी उघड-उघड या बेकायदेशीर बांधकामांना पाठिंबा देत, ती पाडू नये म्हणून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच साकडे घातले आहे, तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची महापालिकेत सत्ता असूनही त्यांनी ‘मौन’ बाळगले आहे. परिणामी, ‘दक्षिणेतील मतांसाठी महापालिकेचा तोटा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

दक्षिणेतील राजकारणात गांधीनगर हे महत्त्वपूर्ण आणि ‘वजनदार गाव’ आहे. संपूर्ण सधन आणि संपन्‍न असलेल्या गावची लोकसंख्या सुमारे 25 हजार आहे. त्यातील दहा हजारांवर नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. साहजिकच, या गावावर ‘वर्चस्व’ राखण्यासाठी सतेज पाटील व महाडिक या दोन्ही गटांकडून सर्व तर्‍हेचे प्रयत्न होत असतात. गांधीनगर ग्रामपंचायतीत पाटील गटाचे बहुमत (9 सदस्य) असले, तरी महाडिक गटाचा सरपंच (8 सदस्य) आहे. अत्यंत ‘अटीतटीचे राजकारण’ असल्याने मतदारांना ‘खूश’ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. तावडे हॉटेल परिसरातील बहुतांश इमारती या गांधीनगरमधील नागरिकांच्याच आहेत. त्यामुळे मतांचा ‘गठ्ठा’ सुरक्षित राखण्यासाठीच महापालिकेच्या ‘हक्‍काच्या जागेवर पाणी’ फिरविण्याचे काम आमदार महाडिक यांच्याकडून केले जात आहे.

कोल्हापूर शहराला लागूनच असलेल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे 22 प्रभाग येतात. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणाचाही दक्षिण विधानसभा मतदारसंघावर परिणाम होत असतो. लोकसभा निवडणुकीतही गांधीनगरातील मतदानाची आकडेवारी निकाल फिरवण्याइतपत ‘निर्णायक’ ठरू शकते. साहजिकच, आमदार महाडिक यांचे चुलतभाऊ खासदार धनंजय महाडिक यांच्या निवडणुकीतही त्याचा ‘लाभ’ उठवता येणार आहे. पूर्वी सतेज पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. परंतु, 2014 मधील विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांनी पाटील यांचा पराभव केला. महाडिक यांना आमदार करण्यात गांधीनगरवासीयांनी 

मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतून शहरवासीयांनी काँग्रेसला साथ दिल्याने पुन्हा पाटील यांना उभारी मिळाली. त्यासह जिल्ह्यातून काँग्रेसच्या मिळालेल्या ‘पाठबळावर’ पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीत तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांचा पराभव करून विधानसभेतील पराभवाचा वचपा काढला. त्यानंतरही गांधीनगर कुणाच्या ताब्यात, यावरून महाडिक व पाटील गटांत ‘शह-काटशहाचे राजकारण’ सुरूच आहे.

कोल्हापूर शहराची गेले 46 वर्षे हद्दवाढ झालेली नाही. शिक्षण, आरोग्यासह सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा असूनही कोल्हापूर म्हणजे एक ‘मोठे खेडे’ बनले आहे. मात्र, त्याचे सोयरसूतक कुठल्याच राज्यकर्त्यांना नसल्याचे वास्तव आहे. दस्तुरखुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच महापालिकेच्या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त देऊ नये, असले राजकारण केल्याची चर्चा आहे. मग महापालिकेचा विकास होणार तरी कसा? काहीही झाले तरी अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतींना पाठिंबा देणे कितपत योग्य आहे? आता कचरा डेपो व ट्रक टर्मिनस या आरक्षित जागेवरील जर त्यांची बेकायदेशीर बांधकामे नियमित करून द्या, असे म्हणू लागल्यावर उद्या उठून रस्त्यावर बांधकामे करतील? मग तीही नियमित करून द्यायची का? असा प्रश्‍न आहे.

Tags : Kolhapur, Loss,  municipal corporation, south, votes