Sun, May 26, 2019 09:04होमपेज › Kolhapur › केएमटीची चाके तोट्यात

केएमटीची चाके तोट्यात

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:33AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सतीश सरीकर

आधीच आर्थिक तोट्यातून धावत असलेल्या केएमटीच्या ताफ्यातील दररोज 8 ते 10 बसेस बंद राहत आहेत. चालकांच्या दांडीमुळे बसेस बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवत आहे. त्यामुळे केएमटीला रोज आणखी सुमारे 50 ते 60 हजारांचा तोटा सहन करावा लागत असून, तोट्याचा आकडा तीन लाखांवर गेला आहे. परिणामी, कोल्हापूरची लाईफलाईन असलेली केएमटी आता डबघाईकडे प्रवास करत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

केएमटीच्या ताफ्यात तब्बल 129 बसेस आहेत. कोल्हापूर शहर व परिसरातील 26 मार्गांवर सुमारे दररोज 100 बसेस धावतात. दररोज सुमारे 26 हजार 826 किलोमीटर केएमटी धावते. एक लाखावर प्रवासी प्रवास करतात. त्यातून केएमटीच्या तिजोरीत सुमारे साडेआठ लाख रुपये जमा होतात. तर, केएमटीला रोज अडीच लाखांचा तोटा सहन करावा लागतो. आता रोज चालकाअभावी बसेस बंद राहून तोट्याचा आकडा तीन लाखांवर गेला आहे. परिणामी, कर्मचार्‍यांचे पगार थकण्याबरोबरच किरकोळ स्पेअर पार्टही दुकानातून उधारीवर आणण्याची नामुष्की केएमटी प्रशासनावर ओढवली आहे. अशा प्रकारे सद्यःस्थितीत केएमटी देणेकर्‍यांबरोबरच उधार-उसनवारीतून धावत आहे.

केएमटीत कायम चालक 194, कायम वाहक 245 यांच्यासह रोजंदारीवरील चालक 116 व वाहक 109 कार्यरत आहेत. काही चालकांनी केएमटीला अक्षरशः वेठीस धरले आहे. चालकांना तीन दिवस अगोदर ड्युटी कळवूनही ते बस मार्गावर धावण्याच्या वेळेला दांडी मारत आहेत. परिणामी, बसेस बंद राहण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने एका दिवसासाठी तीन दिवसांचा खाडा मांडून पगार कपात केली जात आहे. रोजंदार चालकांचा 450 रुपयांसाठी 1350 रुपये, तर कायम चालकांचा 4250 रु. एका दिवसाच्या खाड्यासाठी पगार कपात करूनही चालकांच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.