Thu, Jun 27, 2019 18:18होमपेज › Kolhapur › लोकसभा नाही, विधानसभाच लढवणार : विनय कोरे

लोकसभा नाही, विधानसभाच लढवणार : विनय कोरे

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 12:19AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

मला एवढ्या लवकर संसदेत जायचे नाही. राज्याच्या राजकारणातच राहून चांगले काम करायचे आहे. त्यामुळे लोकसभा नाही तर विधानसभाच लढवणार, असे सांगत जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांनी गुरुवारी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लढण्याच्या चर्चेलाच पूर्णविराम दिला. 

दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची केलेली मागणी व्यवहारी नाही, हे अनुदान देणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी सोमवारपासून पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे, असेही कोरे म्हणाले, ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघात खा. शेट्टी यांच्याविरोधात कोण, हा सर्वच पक्षांच्या समोरचा प्रश्‍न आहे. भाजपच्या यादीत काही सनदी अधिकार्‍यांरोबरच अनेकांची नावे पुढे येत होती. त्यात  कोरे यांचेही नाव अलीकडे येऊ लागले. खा. शेट्टी यांनी दूध दराचे आंदोलन पुकारल्यानंतर कोरे यांनी निर्यात दुधाला प्रतिलिटर पाच रुपये व पावडरला प्रतिकिलो 50 रुपये अनुदानाची मागणी केली.

हीच मागणी सरकारने मान्य करताना त्याची घोषणा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत केली. त्यानंतर खा. शेट्टी यांच्याविरोधात कोरे हेच रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरू झाली. यासंदर्भात बोलताना कोरे म्हणाले, मला एवढ्या लवकर राष्ट्रीय राजकारणात जायचे नाही, त्यामुळे लोकसभा लढवणार नाही. राज्याच्या राजकारणात राहून चांगले काम करायचे असल्याने मी विधानसभा निवडणूकच लढवणार आहे.