Mon, Aug 19, 2019 07:14होमपेज › Kolhapur › लोकसभेसाठी मंडलिक गटाच्या जोर-बैठका सुरू

लोकसभेसाठी मंडलिक गटाच्या जोर-बैठका सुरू

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 12:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्याकडून जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून चार दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराला लागून असलेल्या एका फॉर्महाऊसवर मंडलिक गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते आजमावण्यात आली. 

पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला महत्त्व असलेल्या कागल तालुक्यात चार गटांपैकी कोणतेही दोन गट एकत्र आल्याशिवाय विजय सुकर होत नाही. कागल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना घेरण्यासाठी भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन घाटगे गटांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शाहू-कागलचे समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजय घाटगे या दोघांच्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावून पालकमंत्री पाटील यांनी या दोघांनाही बळ देण्याचे सुतोवाच केले आहे. सद्यस्थितीत प्रा. मंडलिक व संजय घाटगे गट एकत्र आहेत, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रा. मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र पराभूत झाले. यामागे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची किनार आहे, त्यातून संजय घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी मदत न केल्याची चर्चा मंडलिक गटात आहे. संजय घाटगे यांचा समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत जाण्यास तीव्र विरोध आहे. अशा परिस्थितीत मंडलिक गटाने कोणती भूमिका घ्यावी हे कार्यकर्त्यांकडून समजून घ्यावे, या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. 

कळंबा तलावाशेजारील एका फॉर्महाऊसवर ही बैठक झाली. बैठकीला कागल तालुक्यातील प्रत्येक गावातील मंडलिक गटाच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मंडलिक गटाचा जाहीर मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची मते आजमावली तर उघडपणे कोण बोलत नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे गावनिहाय या बैठकीत कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात आली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी सात वाजता संपली. स्वतः प्रा. मंडलिक यांनी या बैठकीला हजेरी लावून कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या.