Sun, Apr 21, 2019 03:49होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी ‘लोकलढा’

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी ‘लोकलढा’

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 27 2018 10:02PM रूकडी : वार्ताहर

कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेली पंचगंगा नदी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व मानवी समाजाच्या अक्षम्य  दुर्लक्षामुळे  प्रदूषणाच्या विळख्यात  सापडली आहे.पंचगंगेची ‘गटारगंगा’  करू पाहणार्‍या प्रवृत्तीला जाग  आणून तिचे  पावित्र्य व  अस्तित्व  अबाधित राहण्यासाठी येत्या  1 जूनपासून निर्णायक लोकलढा उभारणार असल्याची माहिती जि.प. माजी उपाध्यक्ष धैर्यशिल माने यांनी रूकडी येथील पत्रकार परिषदेत दिली.   या जनआंदोलनामुळे पंचगंगेचे पाणी  पेटणार अशी स्थिती निर्माण झाली  आहे.                

यावेळी माने म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील विविध नाल्यातील मैला व रसायनयुक्‍त असे  दररोज 40 एम. एल. डी. म्हणजेच सुमारे चारशे टँकर प्रदूषित सांडपाणी  प्रक्रियेविना दररोज मिसळत असून, प्रदूषणाचा हा  ज्वलंत  प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. जागतिक  प्रदूषित नदी सर्व्हेशणात पंचगंगा नदीचा  तिसरा  क्रमांक  लागतो. पण  सुज्ञ शहरवासीयांना कोणत्याही परिस्थितीत  पिण्यासाठी शुद्ध पाणी हवे आहे; पण  त्यांचे सांडपाणी नदीच्या काठावरील  नागरिकांनी प्यावे लागते याचे त्यांना कोणतेच सोयरसूतक नाही. आमची  जनावरांत गणना करू नका, असा सूचक इशारा  नदीकाठच्या गावांतून  दिला जात आहे. 

या कृती समितीचे केंद्रस्थान व सुरुवात रूकडी येथून होणार  असून, कोल्हापूर ते राजापूर (ता. शिरोळ) दरम्यानच्या  हातकणंगले ,शिरोळ या तालुक्यातील पंचगंगा नदी काठावरील सुमारे 38 गावांच्या ग्रामपंचायती व ग्रामस्थांची प्रदूषण मुक्‍तीसाठी सहकार्याची, एकजुटीची वज्रमूठ बांधणार असल्याची माहिती धैर्यशिल माने यांनी  यावेळी दिली. शिवाय संबंधित ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन प्रदूषित पाणी  प्रश्‍नावर  कृती समितीचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदनासह लक्ष  वेधण्यात येणार आहे. याकामी  स्वतंत्र  बैठक घेण्यासही भाग पाडू, असा  निर्धार कृती समितीने व्यक्‍त केला  आहे. 

साखळी उपोषणाने प्रबोधनतसेच 1जूनपासून रूकडी गावातून साखळी उपोषणास सुरुवात करणार असून, त्याची व्याप्ती प्रदूषणग्रस्त गावागावांतून वाढवणार आहे. याप्रसंगी रूकडीचे सरपंच रफिक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, माजी जि. प. सदस्य बबलू मकानदार,  माजी उपसरपंच मोहन माने, रणजित कदम आदी उपस्थित 
होते.

लढ्याला राजकीय रंग नको...

पंचगंगा नदी कोल्हापूर शहरास हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील बहुतांशी गावांचा पिण्याचा पाण्याचा मुख्य आधार होता; पण आता तो निराधार बनला आहे. त्यामुळे हा पंचगंगा प्रदूषण मुक्‍तीचा हा लढा जनतेच्या  हक्‍काचा असून तो पक्षविरहीत आहे. त्यास राजकीय रागरंग देऊ नये, असे आवाहन धैर्यशिल माने यांनी व्यक्‍त केले आहे.

तर नद्यांचे अस्तित्व राहणार नाही

नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे  लोक  कावीळ, कॅन्सर , साथीचे, पोटाचे व त्वचेचे  रोग इ. आजारांनी ग्रासले आहेत. त्यामुळे  नदीकाठच्या प्रत्येक  गावांतून थेट पाईपलाईनद्वारे धरणातून किंवा विना प्रदूषित नद्यांमधून पाणी पुरवठा विषयी मागण्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात स्वच्छ, मुबलक पाणी देणार्‍या नद्या अस्तित्वात राहतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.