Mon, May 20, 2019 22:43होमपेज › Kolhapur › जिल्हा बँकेच्या वतीने खडकी कोंबड्यांसाठी कर्ज योजना

जिल्हा बँकेच्या वतीने खडकी कोंबड्यांसाठी कर्ज योजना

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 1:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या रोजगार निर्मिती होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने खडकी कोंबड्या पालनासाठी तीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनेतून जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना कर्जपुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक बचत गटाला एका लाखापर्यंतच्या कर्जाची मर्यादा आहे. बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. 

बैठकीला पी. जी. शिंदे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अनिल पाटील, अशोक चराटी, भैया माने, आर. के. पोवार, श्रीमती निवेदिता माने आदी संचालक उपस्थित होते. 
 तिन्ही योजना पाच वर्षे मुदतीच्या आहेत. यासाठी 12 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. भांडवली खर्चाची मुदत पाच वर्षे तर खेळत्या भांडवलाची मुदत एक वर्ष आहे. बागायत जमीन असल्या एक एकर, जिराईत जमीन असल्यास दोन एकर, ही जमीन रजिस्टर तारण घेऊन हे कर्ज दिले जाणार आहे. 

अशा आहेत योजना 
गावठी/खडकी कोंबड्या योजना
परसातील कोंबडी पालनासाठी 100 पिलांसाठी बारा हजारांचे कर्ज दिले जाणार आहे. बचत गटातील जास्तीत जास्त आठ महिलांना एक लाखापर्यंत हे कर्ज वाटप केले जाणार आहे. याच योजनेतून विकास सेवा संस्थेच्या सभासदांसाठी 500 कोंबड्यांसाठी 1 लाख 55 हजार भांडवली खर्च व खेळते भांडवल 60 हजार रुपये असे एकूण 2 लाख 15 हजारांचा हा प्रकल्प आहे. त्यापैकी 15 टक्के स्वगुंतवणुकीत 32 हजार 250 रुपये वजा जाता व उर्वरित 1 लाख 82 हजार 750 रुपये बँकेचे कर्ज मिळणार आहे. 

अंडी देणार्‍या कोंबड्या 
विकास सेवा संस्थांच्या सभासदांसाठी असलेल्या या योजनेमध्ये 1 हजार कोंबड्यांसाठी भांडवली खर्च 3 लाख 64 हजार 500 व 3 लाख 55 हजार खेळते भांडवल असे एकूण 7 लाख 19 हजार 500 रुपयांचा हा प्रकल्प आहे. यात 15 टक्के स्वगुंतवणुकीतील 1 लाख 8 हजार वजा जाता बँकेकडून 6 लाख 11 हजार रुपये कर्ज उचल मिळणार आहे.

बॉयलर/मांसल कोंबड्या
सेवा संस्थेच्या सभासदांसाठी ही योजना आहे. 500 कोंबड्यांसाठी भांडवली खर्च 1 लाख 55 हजार, खेळते भांडवल 70 हजार पाचशे रुपये असा 2 लाख 25 हजारांचा हा प्रकल्प आहे. 15 टक्के व्याजदरानुसार 34 हजार स्वगुंतवणूक वजा जाता बँकेकडून 1 लाख 91 हजार 500 रुपये कर्ज मिळणार आहे. याच योजनेत 1 हजार कोंबड्यांसाठी याचा दुप्पट कर्ज उचलीची ही सुविधा आहे. 

ग्रामीण भागातील महिलांनी लाभ घ्या
बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना त्यांच्या घरातच रोजगार निर्माण होऊन अर्थार्जन व्हावे, या उद्देशाने बँकेने ही योजना जाहीर केली आहे. ग्रामीण भागातील महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही  आ. मुश्रीफ यांनी केले आहे.