होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात दहा वर्षांत पशुधन तीन लाखांनी घटले?

जिल्ह्यात दहा वर्षांत पशुधन तीन लाखांनी घटले?

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:45PMकोल्हापूर : नसिम सनदी 

गेल्या दहा वर्षांत 2007 आणि 2012 अशा दोनवेळा झालेल्या गणनेत जिल्ह्यातील पशुधनात तब्बल 3 लाख 9 हजार 548 इतकी घट झाल्याचे आढळून आले होते. 2007 ला  21 लाख 31 हजार 428 असणारे पशुधन 2012 साली कमी होऊन ते 18 लाख 21 हजार 880 पर्यंत खाली आले. गेल्या 5 वर्षांत यात आणखी घट झाल्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागातील अधिकारी वर्तवत आहेत. 

जनावर संगोपनाचा वाढलेला खर्च व शासन धोरण याच्यासह नव्या पिढीची व्यवसायाकडे बघण्याची बदललेली मानसिकता याला कारणीभूत ठरली आहे. भरलेला गोठा हे ग्रामीण भागातील समृद्धीचे प्रतीक मानले जात होते; पण अलीकडे गावागावांतील चित्र बदलताना दिसत आहे. 

दर पाच वर्षांनी होणारी पशुगणना टॅबसारख्या अत्याधुनिक साधनाद्वारे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. तशा सूचना जिल्हा परिषदांना प्राप्त झाल्या. गणनेसाठी प्रगणक नेमले गेले, त्यांचे प्रशिक्षण झाले, टॅब मागणीचा आकडा पाठवण्यात आला. या घटनेला आता सहा महिने उलटून गेले आहेत, अजूनपर्यंत ना टॅब आले, ना पशुगणना सुरू झाली. जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग कधी आदेश येतील याच प्रतीक्षेत बसला आहे. यासंदर्भात कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने 20 वी पशुगणना होईल की नाही, यावरच आता शंका उपस्थित होत आहेत. 

ही गणना यावेळी पारंपरिक पद्धतीने न होता अत्याधुनिक साधनाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा परिषदेकडून प्रगणकांची नियुक्ती आणि टॅबच्या संख्येची माहिती मागवण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेने 450 टॅब लागतील, अशी मागणी कळवण्यात आली. एका कुटुंबामागे 6 रुपये असे प्रगणकांना मानधन देण्याचे मान्य करून या प्रगणकांना टॅबद्वारे गणना करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. याला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मागणीप्रमाणे अजूनही केंद्र सरकारकडून टॅबचा पुरवठा झालेला नाही. टॅबच नसल्याने गणनेचे कामही हाती घेण्यात आलेले नाही. सहा महिन्यांपासून हे काम पूर्णपणे ठप्प झाल्याने जिल्हा परिषद कधी आदेश येतील, याच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एच. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला.