Sun, Apr 21, 2019 04:43होमपेज › Kolhapur › लिंगायत समाजाच्या महामोर्चाला सर्व स्तरांतून पाठिंबा

लिंगायत समाजाच्या महामोर्चाला पाठिंबा

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 17 2018 1:57AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

स्वतंत्र लिंगायत धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी कोल्हापुरात रविवार, दि. 28 रोजी लिंगायत समाजाने राज्यव्यापी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गावागावांत जनजागृती सुरू असल्याची माहिती सौ. सरलाताई पाटील यांनी दिली. लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन मोर्चाच्या नियोजनाची माहिती दिली.

यावेळी लिंगायत धर्माचे समाज सुधारणेतील महत्त्व, समाजातील जाती-पोटजाती, स्वतंत्र धर्माची मागणी कशी  रास्त  आणि  न्याय्य आहे, महामोर्चाची तयारी, नियोजन आदी विविध विषयांवर शिष्टमंडळाने डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली. 

पाटील म्हणाल्या, स्वातंत्र्यपूर्व काळात 1871 ते 1931 पर्यंत लिंगायत म्हणून स्वतंत्र जनगणना होत होती. सैन्यात लिंगायत धर्माची स्वतंत्र रेजिमेंट होती. उच्च, सर्वोच्च न्यायालयांच्या अनेक निकालांतही लिंगायत धर्माची नोंद आहे. स्वतंत्र धर्माची मान्यता अद्याप नसल्याने समाजाला विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. 

कराड येथे 9 ऑगस्ट 2014 रोजी राज्यव्यापी आंदोलन झाले. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने 26 ऑगस्ट 2014 रोजी शासनाने समिती नेमली. या समितीने लिंगायत धर्मातील 14 जातींना इतर मागासप्रवर्गाचा विशेष दर्जा दिला. उर्वरित पोटजातींचा अभ्यास करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे पाठवण्यात आले. मागासवर्गीय आयोगानेही लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याने त्यातील अन्य जातींना आरक्षण देता येईल, असे म्हटले आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा आणि अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठीही केंद्र शासनाला राज्य शासनाने केंद्र शासनाला शिफारस करावी, अशी सूचना समितीने केली आहे. मात्र, अडीच वर्षे झाली. ही कार्यवाही झाली 
नाही. 

या पार्श्‍वभूमीवर राज्यात लातूर, नांदेड, सांगली यासह कर्नाटकात  मोर्चे निघाले आहेत. कोल्हापुरात दि. 28 रोजी मोर्चा काढण्यात येईल. दसरा चौकात सकाळी दहा वाजता मोर्चाला प्रारंभ होईल. लिंगायत धर्माचे स्वामी, मान्यवरांच्या भाषणानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. लातूर येथील 96 वर्षीय स्वातंत्र्य सैनिक मुर्गाप्पा खुमसे यांच्या हस्ते निवेदन देण्यात येणार आहे.

मोर्चातील सहभागासाठी गावागावांत फेर्‍या, बैठकांचे आयोजन केले जात आहे. राज्यातील विविध भागांसह कर्नाटकातूनही या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहेत, त्या द‍ृष्टीने नियोजन सुरू आहे. विविध संस्था, संघटनांच्या वतीनेही या मोर्चास पाठिंबा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात राजशेखर तंबाके, बाबुराव तारळी, सदाशिव देवताळे, सर्जेराव विभुते, सुनील गाताडे, चंद्रशेखर बटकडली, मल्लाप्पा तळेवाडीकर, राजू गवळी, सुधीर पांगे, भीमराव पाटील, विलास आंबोळे आदींचा समावेश होता.