Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Kolhapur › लिंगायत समाजाचा विराट मोर्चा

लिंगायत समाजाचा विराट मोर्चा

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:59PMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘भारत देशा, जय बसवेशा’, ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’, अशा घोषणा देत लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्या, या मागणीसाठी लिंगायत समाज बांधवांनी रविवारी (दि.28)  कोल्हापुरात विराट मोर्चा काढला. मोर्चात पंजाब, दक्षिण भारतासह सांगली, सातारा, बेळगाव येथील हजारो लिंगायत बांधव सहभागी झाले होते. ‘जगज्योती महात्मा बसवेश्‍वर महाराज की जय’, ‘आम्ही लिंगायत, आमचा धर्म लिंगायत’, अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून निघाला. लिंगायत महामोर्चात देशभरातून दीड लाख समाज बांधव सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.

दरम्यान, लातूरचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मुर्गाप्पा खुमसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र धर्म मान्यता मिळावी, अल्पसंख्याक दर्जा मिळावा, जनगणना फॉर्ममध्ये लिंगायत नोंदणीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने दसरा चौकात राज्यव्यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक संयोजन समितीमार्फत मोर्चाचे नियोजन करण्यात आले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच नागरिकांचे जथ्थे दसरा चौकात येण्यास प्रारंभ झाला. यात निपाणी, बेळगाव, सांगली, सातारा, सोलापूरसह जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील समाज बांधव महामोर्चाच्या ठिकाणी जमत होते. मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते हे पथकांसह मोर्चावर लक्ष ठेवून होते. व्हीनस कॉर्नर ते सीपीआर चौकापर्यंतची वाहतूक बंद करून हा मार्ग मोर्चासाठी राखीव ठेवण्यात आला होता. रेल्वे, बस व स्वतंत्र वाहनातून येणार्‍या नागरिकांना स्वयंसेवक मोर्चास्थळी जाण्यासाठी मार्ग दाखवून सूचना करत होते.

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या सदस्या सरलाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी लिंगायत समाज एकत्र आला आहे. लिंगायत समाजाची अस्मिता जागी झाली आहे. शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय आता थांबायचे नाही. काकासाहेब कोईटे (पुणे) म्हणाले, लिंगायत समाजाचा न्याय्य मागण्यांसाठी अनेक वर्षे लढा सुरू आहे. संघर्ष समितीने जगभर लढा घेऊन जावा, असे आवाहन केले. युवक यश अंबोळे म्हणाला, भारतात बसवाण्णा यांच्या नेतृत्वाखाली शरण आंदोलनाद्वारे भक्ती चळवळीचा अविष्कार झाला. सर्व भेदांचे उच्चाटन करून मानवी मूल्यांवर आधारित जीवनशैलीचे आचरण करणारा नवीन लिंगायत धर्म महात्मा बसवेश्‍वर यांनी जगाला दिला.

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष व माजी खा. सिमरनजित मान म्हणाले, शीख धर्म जात-पंथ न मानणार्‍या लिंगायत समाजातील लोकांबरोबर असल्याचे पाहून आनंद होत आहे. काँगे्रस व भाजप पक्ष तुमच्या न्याय्य मागण्या संसद, विधानसभेत मांडणार नाहीत. त्यासाठी लिंगायत समाजाचे प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत. राजकारणात आल्याशिवाय मागण्यांची पूर्तता होणार नाही. 800 वर्षे पूर्ण झालेला लिंगायत धर्म आहे. या धर्माचे देशात नऊ कोटी लोक राहत आहेत. डॉ. एम. एम. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या एकाच गोळीने झाली आहे. त्याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. गुन्हेगार मोकाट असल्याची टीका सिमरनजित मान यांनी सरकारवर केली.

बसवेश्‍वर येरटे यांनी, शिवाचार्य महाराज स्वामी यांच्या वतीने जिवंत असेपर्यंत लिंगायत धर्मासाठी लढण्याचा संदेश दिला. कोरणेश्‍वर महास्वामी म्हणाले, लिंगायत समाज बांधव संविधानिक मान्यतेसाठी एकत्र आला आहे. आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हावे. चन्नबसवानंद स्वामी म्हणाले, कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतील महामोर्चा विशेष आहे. 30 वर्षांपासून लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यास दक्षिण भारतातून सहकार्य लाभत आहे. स्वामी भालकी आप्पाजी म्हणाले, लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म आहे, हे सर्वांना माहीत व्हायला हवे. केंद्र व राज्य सरकार लिंगायत धर्मास मान्यता देत नाही, तोपर्यंत चळवळ करण्याची गरज आहे. 

आ. हसन मुश्रीफ म्हणाले, आघाडी सरकारने माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य केल्या होत्या. लिंगायत समाजाला आरक्षणाचे फायदे मिळाले पाहिजेत, ही भूमिका आहे. आगामी अधिवेशनात लिंगायत धर्माला मान्यता मिळवून देण्यासाठी आवाज उठविणार आहे.

आ. सतेज पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीने समतेचा संदेश दिला आहे. क्रांती व संघटित ताकदीने देशातील प्रश्‍न सुटले आहेत. याची सुरुवात कोल्हापुरातून झाल्याने लिंगायत समाजाचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. सर्व समाज घटक पाठीशी असल्याने सरकारला दखल घ्यावी लागणार आहे. आ. सुजित मिणचेकर म्हणाले, लिंगायत धर्म भारतातील क्रांतिकारी धर्म आहे. आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्‍वर यांनी पहिली लोकशाही व्यवस्था निर्माण केली. शांतताप्रिय मार्गांनी त्यांनी नीतिमूल्ये समाजाला सांगितली. सूत्रसंचलन किरण कोरे, संदीप कोयटे, राजाभाऊ म्हाळगी यांनी केले. यावेळी माजी आमदार मनोहर पटवारी, चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे ललित गांधी, अ‍ॅड. प्रीतम सांभारे, काकासाहेब कोईटे, सूर्यकांत पाटील-बुध्याळकर, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर, बबन रानगे, व्यंकाप्पा भोसले, राजशेखर तंबाके, बाबुराव तारळी, सुनील गाताडे, अमर पाटील यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.

महिलांचा सहभाग लक्षणीय

‘मी लिंगायत, स्वतंत्र धर्म लिंगायत’ असे लिहिलेले हातात भगवे झेंडे, डोक्यावर पांढरी टोपी घालून समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. ‘महात्मा बसवेश्‍वरांचा विजय असो’, अशा घोषणा देत नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे चारही बाजूंनी दसरा चौकाकडे कूच करत असल्याने प्रचंड गर्दी झाली होती. यात लिंगायत समाजातील ज्येष्ठ नागरिकांसह तरुण मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. तरुणी व महिलांचा सहभागही लक्षणीय होता.