होमपेज › Kolhapur › ‘लिंगायत’ महामोर्चासाठी ७७ समाजांचा पाठिंबा

‘लिंगायत’ महामोर्चासाठी ७७ समाजांचा पाठिंबा

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:41AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर येथे रविवारी (दि. 28) होणार्‍या लिंगायत समाज बांधवांच्या महामोर्चास जिल्ह्यातील 77 समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच समाजबांधवांसह मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊ, असे आश्‍वासनही यावेळी देण्यात आला. महामोर्चाच्या तयारीसाठी राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचच्या वतीने मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वसंतराव मुळीक होते. 

प्रारंभी सरलाताई पाटील यांनी मोर्चाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. लिंगायत समाज हा संख्येने कमी असूनही या समाजाला कोणत्याही शासकीय सुविधा मिळत नाहीत. यामुळे या समाजातील नागरिकांची उपेक्षा सुरू आहे. तेव्हा या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा यासह अन्य मागण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी इतर समाजातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

ललित गांधी म्हणाले, मराठा समाजाने मोर्चाचा आदर्श घालून दिला आहे, त्यावर आधारित हा मोर्चा काढावा, त्यासाठी सहकार्य केले जाईल. श्रीकांत बनछोडे म्हणाले, लिंगायत समाजाच्या महामोर्चासाठी सर्व जातीच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे, यातून जिवाभावाची मानस किती आहेत. याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. 

वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. लिंगायत समाज आणि मराठा समाज आम्ही सहयोगी आहोत, लिंगायत समाजाचा विचार करता या समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. यामुळे लिंगायत समाजाचा महामोर्चा होईल, जसा मराठा समाजाचा मोर्चा झाला, तसाच हा ही मोर्चा होईल. कोल्हापुरातील सामाजिक सलोख्याची ज्योत देशभर तेवत राहील, असेही त्यांनी सांगितले. तसेच या मोर्चाच्या निमित्ताने ज्यांना स्वयंसेवक व्हावयाचे आहे व काही मदत करावयाची आहे, त्यांनी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठामध्ये नावे नोंदवावीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. राज शिरगुप्पे, प्रा. शरद गायकवाड, सुभाष देसाई, गणी आजरेकर पद्याकर कापसे आदींनी विचार मांडले.
यावेळी हसन देसाई, कादर मलबारी, धोंडीराम ओतारी, उमेश पोर्लेकर, महेश मछले, रामचंद्र पोवार, अरमरसिंह रजपूत, अर्जुन माने, शहाजी सिद्ध, अशोक भंडारे उपस्थित होते.