Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Kolhapur › लिंगायत धर्मास अल्पसंख्याक दर्जा द्या

लिंगायत धर्मास अल्पसंख्याक दर्जा द्या

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:29PMकोल्हापूर : प्रतिनिधी

लिंगायत धर्मास अल्पसंख्याक दर्जा द्यावा, ऑगस्ट 2014 च्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी  यासह अन्य मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने रविवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. 

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी कोल्हापुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. समाज बांधव दसरा चौकात जमा झाल्यानंतर शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.  

लिंगायत धर्मीय समाज बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी गेली कित्येक वर्षे लढा सुरू आहे. या लढ्याचाच भाग म्हणून यापूर्वी मुंबई, कराड या ठिकाणी आंदोलने करण्यात आली. यासंदर्भात शासनाने अनेकवेळा आश्‍वासने दिली. शासन नियुक्त कमिटीच्या शिफारशींनुसार महाराष्ट्र शासनाने लिंगायत धर्मातील 14 पोट जातींचा आरक्षणात समावेश केला आणि स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यतेची शिफारस केंद्राकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राज्य शासनाच्या 26 ऑगस्ट 2014 च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता; पण या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. ऑगस्ट 2014 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करावी, लिंगायत धर्माला राष्ट्रीयस्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा खुमसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या सदस्य सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, काकासाहेब कोयटे, विजयकुमार शेटे, मनोहर पटवारी आदींचा समावेश होता. 

मराठा महासंघाच्या वतीने बिस्किटांचे वाटप

लिंगायत महामोर्चासाठी विविध संस्था, समाज, मंडळांच्या वतीने केळी, बोरांचे वाटप करण्यात आले. मराठा महासंघाच्या वतीने बिस्किटांचे वाटप करण्यात आले.  

सुरक्षेची तगडी यंत्रणा

महामोर्चाच्या निमित्ताने कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने लिंगायत समाज बांधव येणार, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तगडी सुरक्षा यंत्रणा लावली होती. त्यामध्ये एक अग्निशमन दलाची गाडी, तसेच स्वतंत्र रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आली होती. शिवाय, अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीनेही रुग्णवाहिका आणि त्यामध्ये डॉक्टर व आरोग्य सेविकांनाही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.

मोर्चेकर्‍यांसाठी पाणी, अल्पोपाहाराची सोय
महामोर्चास येणार्‍या लिंगायत समाज बांधवांना दसरा चौकातील लिंगायत बोर्डिंग, वारणा उद्योग समूह, मुस्लिम बांधवांच्या वतीने पाण्याचे पाऊच देण्यात आले. पाण्याचे पाऊच रस्त्यावर टाकू नका, अशा सूचना यावेळी दिल्या जात होत्या. व्हीनस कॉर्नरजवळ समस्त मुस्लिम समाज बांधवांतर्फे मोर्चेकर्‍यांसाठी अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. 

महामोर्चास 77 संघटनांचा पाठिंबा

लिंगायत समाज महामोर्चास शाहू महाराज, महापौर स्वाती यवलुजे, खा. धनंजय महाडिक, आ. संध्यादेवी कुपेकर, आ. राजेश क्षीरसागर, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, माजी आ. संजय घाटगे, माजी आ. राजीव आवळे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानी संघटनेचे भगवान काटे, नंदाताई बाभूळकर, वीरेंद्र मंडलिक, संभाजी ब्रिगेडचे अमोल पाटील, बामसेफ, मुस्लिम सेना, दक्षिण भारत जैन सभा, महापालिका सर्व नगरसेवक यांच्यासह विविध 77 संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा पत्र व उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला.

सोलापुरात 3 जून रोजी लिंगायत समाज महामोर्चा

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने 3 जून रोजी सोलापूर येथे लिंगायत समाज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले. 

600 हून अधिक स्वयंसेवक कार्यरत

दसरा चौकात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठावरून मोर्चासाठी येणार्‍या समाज बांधवांना शिस्तीचे पालन करण्याबाबत 600 हून अधिक स्वयंसेवक सूचना देत होते. गावागावांतून येणार्‍या नागरिकांची जबाबदारी तालुकाप्रमुखांवर सोपविण्यात आली होती. व्यासपीठावर दोन रांगेत, मागील रांगेत धर्मगुरू आणि पुढील रांगेत समन्वय समितीचे पदाधिकारी यांचा समावेश होता.

ग्रामपंचायतींचे ठराव जिल्हाधिकार्‍यांकडे

अब्दुललाट, पिंपळगाव खुर्द, नवे-जुने दानवाड, रेंदाळ, नेर्ली सावर्डे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत लिंगायत धर्मास मान्यता द्यावी, असे ठराव केले. तसे पत्र संयोजकांना दिले. त्यांनी महामोर्चावेळी उपस्थित जनसमुदायास वाचून दाखविले. ठराव जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले.

महापुरुषांच्या वेशभूषेतील बालकांनी लक्ष वेधले

‘होय, आम्ही लिंगायत आहोत, आमचा स्वतंत्र लिंगायत धर्म आहे.संविधानिक मान्यता मिळवून देण्यासाठी तन-मन व प्राण समर्पित करू,’ अशी शपथ लातूरच्या शिवानंद हैबतपुरे यांनी उपस्थितांना दिली. महात्मा बसवेश्‍वर, अक्कमहादेवी व लिंगायत धर्मगुरू यांची वेशभूषा केलेल्या बालकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.