Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Kolhapur › एका दिवसात थेट हातात मिळणार लायसेन्स

एका दिवसात थेट हातात मिळणार लायसेन्स

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 1:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शासकीय कार्यालयात ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब,’ असा अनुभव नेहमीच नागरिकांना येतो. यास कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय अपवाद ठरले आहे. वाहनचालकांना एका दिवसात थेट हातात लायसेन्स देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावास शासनाची लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. वाहन नोंदणी यासह अन्य गोष्टींसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागतात. आरटीओ कार्यालयात लायसेन्सपासून वाहनांच्या नोंदणीसाठी एजंट गाठावा लागतो. एवढे करूनही विहित कालावधीत कागदपत्रे हातात मिळत नसल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. 2011 मध्ये एजंटांच्या तावडीतून जनतेची सुटका करण्यासाठी शासनाने मोटार वाहन कायद्यात बदल केला. 

वाहनचालकांना लायसेन्स व आर.सी. पुस्तके हातात न देता थेट स्पीड पोस्टाने घरी पाठविण्यात येऊ लागल्याने पिळवणूक थांबली. काही दिवसांपूर्वी जनतेचा त्रास कमी करण्यासाठी शासनाने सेवा हमी कायदा केला. प्रत्यक्षात मात्र सेवा देताना दिरंगाई होण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले. या सर्वप्रकारच्या जाचातून नागरिकांची सुटका करून कोंडी फोडण्याचा विडा कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी उचलला. त्यांनी शासनाला एक अहवाल सादर केला. यात आरटीओ कार्यालयाची बदनामी होण्याचे मुख्य कारण दिरंगाई आहे. कार्यालयात दैनंदिन दाखल होणारे लायसेन्स व वाहनांसंदर्भातील कामाची शून्य प्रलंबितता सिद्ध होणे गरजेचे आहे. लायसेन्स व आर.सी. पुस्तके थेट जनतेच्या हातात देण्याची कराड कार्यालयास परवानगी मिळावी, अशी त्यांनी अहवालात विनंती केली. 

शासनाने आधारकार्डाद्वारे संबंधित व्यक्‍तीची ओळख पटवून थेट लायसेन्स व आर.सी. पुस्तक हातात देण्यास प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली. यास तत्कालीन परिवहन आयुक्‍त व प्रधान सचिव मनोज सौनिक, सह परिवहन आयुक्‍त प्रसाद महाजन यांनी पाठबळ दिले. छोट्याशा कराड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका तासात लर्निंग लायसेन्स, दोन तासात रिन्यूव्हल, तीन तासात ड्रायव्हिंग टेस्ट दिल्यानंतर पक्के लायसेन्स आणि नवीन गाडी दाखविल्यानंतर चार तासात आर.सी. पुस्तक वाहनचालकाच्या हातात देण्याचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 18 मार्च रोजी सुरू केला. राज्यातीलच नव्हे, तर देशातील हा अशाप्रकारचा पहिला उपक्रम आहे.

कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पदाचा अतिरिक्‍त कार्यभार कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी लायसेन्स व आर.सी. पुस्तकाबाबत कराडचा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोेल्हापूर कार्यालयात वाहनांच्या टेस्टसाठी व लायसेन्स नूतनीकरणासाठी येणार्‍या सुमारे 300 वाहनचालकांना त्याच दिवशी हातात लायसेन्स देण्याबाबत त्यांनी आराखडा तयार केला आहे.  

याचाच एक भाग म्हणून फक्‍त पाच दिवसांत कोल्हापूर कार्यालयातील लायसेन्सच्या चार हजार प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला आहे. 6 जूनपासून वाहन टेस्ट, लायसेन्स व नूतनीकरणासाठी येणार्‍या प्रत्येक अर्जावर कार्यवाही करून त्याच दिवशी लायसेन्स तयार करण्याचे काम केले आहे. शासनाकडून विहित परवानगी मिळाल्यानंतर थेट हातात लायसेन्स मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ज्या व्यक्‍तींना थेट हातात लायसेन्स नको आहे, अशांसाठी तीन दिवसांच्या मुदतीनंतर घरपोच पोस्टाने लायसेन्स पाठविण्याचा प्रस्तावदेखील आहे. सद्यस्थितीत हा उपक्रम केवळ कोल्हापूर कार्यालयात वाहन टेस्टसाठी दाखल प्रकरणांसाठी असल्याचे परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.