होमपेज › Kolhapur › वनौषधी लावूया, आजीच्या बटव्याचे संवर्धन करू या!

वनौषधी लावूया, आजीच्या बटव्याचे संवर्धन करू या!

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 24 2018 10:07PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

ज्येष्ठांचा अनुभव नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतो. यामुळेच प्रत्येक घरात ज्येष्ठ असावेतच. ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच पर्यावरणाच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी व्हावा, या उद्देशाने निसर्गमित्र संस्थेच्या वतीने आणखी एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘वनौषधी लावूया, आजीच्या बटव्याचे संवर्धन करूया’ या संकल्पनेंतर्गत घरात पूर्वापार चालत आलेल्या आणि आजीकडून बटव्यात जतन करून ठेवण्यात आलेल्या विविध वनौषधींची माहिती संकलित करून ती सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. 

प्रत्येक सजीवाला काहीना-काही शारीरिक व्याधींबरोबरच अपघातासारख्या दुर्घटनांना समोरे जावे लागते. यावर उपचार म्हणून आपल्या पूर्वजांनी विविध प्रकारची वनौषधी शोधून काढली आहेत. कालओघात आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे या वनौषधींचा वापर कमी झाला. शिवाय मानवी विकासाच्या लाटेत अनेक औषधी वनस्पती दुर्मीळ बनल्या. वास्तविक पूर्वजांच्या वैद्यकीय ज्ञानाचे प्रतीक म्हणून या वनौषधींचे जतन अत्यावश्यक आहे. नेमक्या याच उद्देशाने निसर्गमित्र संस्थेतर्फे ही मोहीम राबविली जात आहे. 

विविध वनौषधीबाबतचे ज्ञान...

विविध प्रकारच्या वनौषधींची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी पुस्तक, पत्रके यासह तज्ज्ञांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. अडुळसा, गुळवेल, वेखंड, सुरण, पानओवा, मोकर्णी, गवती चहा, मेहंदी, कडीपत्ता,  माबाळ अशा वनस्पतींच्या मूळ, खोड, साल, पाने, फुले, कंद त्यांच्यापासून निर्माण होणारे तेल यापासून कोणकोणत्या व्याधींवर उपचार होऊ शकतात यांची माहिती प्रसारित केली जाते. सर्दी-खोकला-ताप अशा सामान्य आजारांबरोबरच कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटफुगी, त्वचारोग,  मधुमेह, सांध्याची सूज, पित्त अशा विविध आजारांवर गुणकारी ठरणार्‍या या वनौषधी आहेत. मानवाच्या व्याधींबरोबरच झाडा-झुडपांच्या वाढीसाठी आवश्यक खत, त्यावर पडणारी रोगराई रोखण्यासाठी उपाययोजना, किड्या-मुंग्या, वाळवीचा प्रादुर्भाव यावर उपयोगी ठरणार्‍या वनस्पतींचीही माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे. त्याचबरोबरच आपल्या परिसरातील वनौषधींचे जतन-संरक्षण व्हावे, यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही लागू करण्यात आल्या आहेत. याशिवाय परिसरातील भिंतींवर, रस्त्याकडेला आवश्यक वृक्ष-वेली-झुडपे उगवलेली असतात. ती शास्त्रीय पद्धतीने काढून रोपे तयार करण्याची मोहीम सुरू आहे. दर रविवारी राबविण्यात येणार्‍या या उपक्रमातही नागरिकांनी सहभागी व्हावे. या सर्व मोहिमेसंदर्भातील अधिक माहितीसाठी निसर्गमित्र द्वारा बापूसाहेब पाटील ग्रंथालय, साईक्स एक्सटेंशन टाकाळा रोड येथे संपर्क साधावा.

वनौषधींच्या जतनासाठी 

... हे करू नका

शहरी व ग्रामीण भागात आपल्या परसात-अंगणात, घराजवळच्या कुंडीत, रस्त्याकडेला, मोकळ्या जागांवर पावसाळ्यात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती उगवतात. यात ब्राम्ही, अंबोशी, केणा, हराळी, माका, टाकाळा, भुईआवळी, धोळ, तांदळी, माठ यांचा समावेश आहे. या वनस्पतींवर कोणतेही कीटकनाशक मारू नका. कडीपत्ता, लिंबू, शेवगा, जास्वंद या झाडांवर फुलपाखराची अंडी पक्‍व होऊन अळी तयार होत असते. त्यातून नव्याने फुलपाखरांची निर्मिती होत असते. यामुळे त्यावर डीडीटी पावडर, बेगॉन स्प्रेसारखी कीटकनाशके मारू नका, कारण त्या आळ्या विविध पक्षांचे खाद्य आहेत. भांडी घासण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमच्या चोथ्याचा वापर करू नका. याचे कण खरकट्यातून पक्षांच्या पोटात जाऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. मुंग्या व माशांसाठी कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर करू नका. नैसिर्गक उपाययोजना करा. 

... हे करा

परिसरातील तण काढण्यासाठी किंवा उपयुक्‍त वनस्पती मुळापासून काढल्यास त्याचे कंपोस्ट खत घरच्या घरी करा. त्यातील उपयुक्‍त वनस्पतींचा वापर करा. भांडी घासण्यासाठी नारळाच्या शेंडीच्या चोथ्याचा वापर करा. घरातील मुंग्या व माशा घालविण्यासाठी हळद, पुदीना किंवा मसाल्यातील उग्र वासाच्या पदार्थांचा वापर करा. झाडांना, वेलींना, कुंडीतील रोपांना सकाळ-सायंकाळी ठिबक पद्धतीने पाणी देऊन पाणी वाचवा.