Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषणाविरोधात जनहित याचिका दाखल करू

पंचगंगा प्रदूषणाविरोधात जनहित याचिका दाखल करू

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 11:58PMशिरोली पुलाची  ः वार्ताहर 

शंभरवर दशलक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय पंचगंगेत सोडण्यात येते. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. जर कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा प्रदूषण प्रश्‍नी ठोस कार्यवाही करणार नसेल तर नाईलाजास्तव थेट पाईपलाईन विरोधातही जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा पंचगंगा प्रदर्शन मुक्तीचे समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी दिला. दरम्यान, सोमवारी (दि. 11) इचलकरंजी प्रांत कार्यालयावर सायकल मोर्चा काढून प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्याचे त्यांनी जाहीर केले.

शिरोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे पंचगंगा नदी बचाव कृती समितीला पाठिंबा म्हणून आयोजित एक दिवसीय साखळी उपोषणकर्त्यांना भेटीप्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच शशिकांत खवरे उपस्थित होते.

माने म्हणाले, कोल्हापूर व इचलकरंजी या मोठ्या शहरांमुळे 50 टक्के पंचगंगा प्रदूषण होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रदूषणासाठी कोट्यवधींचा निधी खर्ची पडला आहे. या पाणीप्रदूषणबाबतचा आढावा घेण्यासाठी खासदारांची समिती कार्यरत आहे. तरीही पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयश आले आहे.

माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, पंचगंगा काठावरील जनतेसह पिकांचे आरोग्य बिघडले आहे. तरीही शासनाने पंचगंगा प्रदर्शनाकडे पाठ फिरवली आहे. पंचगंगा प्रदूषणमक्ती लढ्यामुळे जनतेमध्ये जागृती निर्माण झाली आहे; परंतु शासनाला जाग आणण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

सरपंच शशिकांत खवरे यांनी पंचगंगा तिरावरील जनतेच्या पंचगंगा प्रदूषणाविरोधात भावना तीव्र झालेल्या आहेत. या साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून शिरोलीचा सांडपाणी प्रकल्प मंजूर असून त्यांच्या जागेचा तिढा सुटलेला आहे; परंतु अद्यापही या प्रकल्पाचा नारळ फुटलेला नाही असे सांगून प्रत्येक गावात सांडपाणी प्रकल्पाची मंजुरी शासनाने करण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रास्ताविक उपसरपंच सुरेश यादव यांनी केले. यावेळी संजय गांधी, पंचायत सदस्य डॉ. सोनाली पाटील, पुष्पा पाटील यांची भाषणे झाली. यावेळी तालुकाप्रमुख  बाजीराव पाटील,  ग्रा.पं. सदस्य संग्राम कदम, प्रकाश कौंदाडे, माजी उपसरपंच राजेश पाटील, उदय पाटील, तंटामुक्त उपाध्यक्ष राजू पाटील, ग्राहक सेना जिल्हाध्यक्ष दीपक यादव आदी उपस्थित होते.   माजी  सरपंच  विठ्ठल  पाटील यांनी आभार  मानले.