Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Kolhapur › नियमाप्रमाणे साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी : आ. क्षीरसागर

नियमाप्रमाणे साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी : आ. क्षीरसागर

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 09 2018 7:28PMकोल्हापूर : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करून गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम लावण्याला परवानगी दिलीच पाहिजे, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नियमाचे पालन करून साऊंड सिस्टीम लावण्याची परवानगी मागणार्‍या तरुण मंडळांना परवानगी नाकारली जात आहे. यासंदर्भात शनिवार पेठेतील शिवगिरी समाज विकास मंडळाने  उच्च न्यायालात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन 12 सप्टेंबरच्या आत याबाबत पोलिस प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे आदेश दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

गेल्या वर्षी पोलिस प्रशासनाने दबाव आणून नियमांचे पालन करून साऊंड सिस्टीम लावणार्‍या मंडळांवरही कारवाई केली. काही मंडळांतील कार्यकर्त्यांना हद्दपार करण्यात आले. यावर्षी गणेशोत्सवामध्ये अनेक तरुण मंडळे साऊंड सिस्टीम लावण्याला पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागत आहेत; पण पोलिसांकडून परवानगी नाकारण्याच्या घटना समोर येत आहेत. याबाबत शिवगिरी मंडळाने दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाच्या नियमाला आधिन राहून साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी, येत्या पाच दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले आहेत.  

राज्यात अन्यत्र साऊंड सिस्टीम लावण्याला परवानगी दिली जात असताना कोल्हापुरातच असे तरुण मंडळांवर अन्याय कोणाच्या सांगण्यावरून केला जात आहे? गेल्या वर्षी साऊंड सिस्टीम लावू नये, असे मंडळांना आवाहन करून लाखो रुपये वाटले गेले. गणेशोत्सवानंतर तरुण मंडळांनी साऊंड सिस्टीम लावू नये यासाठी मंत्र्यांनी अंबाबाई देवीला साकडे घातले हेाते. गतवर्षी साऊंड सिस्टीमशिवाय गणेशोत्सव साजरा झाला, असे सांगण्यात आले. पण, मंडळांमध्ये प्रचंड नाराजी होती. 
नियम मोडून साऊंड सिस्टीम लावा, असे आम्ही म्हणत नाही; पण नियमाप्रमाणे परवानगी दिलीचपाहीजेे. गेल्या वर्षी  राजारामपुरी भागातील तरुण मंडळांवर कारवाई केली. त्यामुळे काही मंडळांनी रस्त्यावरच ट्रॅक्टर-ट्रॉली सोडून पोलिस प्रशासनाचा निषेध केला; पण यावेळी मी हा अन्याय होऊ देणार नाही. राजारामपुरी तरुण मंडळांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी आपण राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. 

माझ्या विरोधातकोणीही उभे राहू देत...  

राजकारणात असूनही काही लोकांना राजकीय प्रगल्भता लवकर येत नाही असे सांगून आ. क्षीरसागर म्हणाले, एका कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजप-शिवसेना युती अभेद्य राहील असे सांगतात, मी निवडणूक लढवणार नाही असेही बोलतात; त्याच दिवशी दुसर्‍या कार्यक्रमात युती तुटणारे वक्‍तव्य करून कोणाची तरी उमेदवारी जाहीर करतात. माझ्या विरोधात महेश जाधव उभा राहू देत नाहीतर आणखी  कोणीही उभे राहू दे, मी जनतेच्या पाठबळावर निवडून येणार आहे. मला निवडणुकीत पाडण्यासाठी वाड्यावर, बावड्यात अनेक चकरा मारल्या; पण काही फरक पडला नाही. 

रविकिरण इंगवले यांनी शिवसेनेते जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्ष संघटन आणखी मजबूत झाले आहे. त्यांना पक्षाची योग्य जबाबदारी दिली जाईल, असे सूतोवाचही  क्षीरसागर यांनी केले. यावेळी इंगवले यांनी धनदांडगे नेते मंडळी एकट्या क्षीरसागर यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जनतेसाठी काम करणार्‍या आमदारांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला  रघुनाथ टिपुगडे, किशोर घाटगे, दीपक गौड, जयवंत हारुगले आदी उपस्थित होते.