होमपेज › Kolhapur › ‘सकल मराठा समाजा’च्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडू : आ. कदम

‘सकल मराठा समाजा’च्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडू : आ. कदम

Published On: Aug 24 2018 1:12AM | Last Updated: Aug 24 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्व जण आग्रही आहोत. सकल मराठा समाजाच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सर्व सदस्यांच्या सहीच्या पत्राद्वारे मांडू, अशी ग्वाही विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम यांनी गुरुवारी दिली. ‘सकल मराठा समाजा’च्या आंदोलकांनी शासकीय विश्रामगृहावर विधिमंडळ समितीसमोर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी गेला महिनाभर आंदोलन सुरू आहे. समितीच्या दौर्‍याला सकल मराठा समाजाने विरोध केला होता. त्यामुळे गेल्या महिन्यात होणारा समितीचा दौरा रद्द करण्यात आला होता. दरम्यान, आजपासून समिती दोन दिवसांच्या दौर्‍यासाठी कोल्हापुरात दाखल झाली. ही माहिती मिळताच संतप्त झालेले ‘सकल मराठा समाजा’चे आंदोलक दुपारी शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले.

सरकारने 100 दिवसांत आरक्षण देतो असे सांगितले होते; पण सरकारला आता चार वर्षे होत आली आहेत, त्याबाबतचा कोणता ठोस निर्णय नाही, सरकार कसे आरक्षण देणार, हे सांगा अशी विचारणा आंदोलकांनी केली. यावर आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबीटकर यांनी सर्वच लोकप्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आग्रही आहेत. त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्नशील आहेत. आम्ही नेहमीच आंदोलनातही सहभागी होत असल्याचे सांगत समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे स्पष्ट केले.

समितीचे अध्यक्ष, आ. कदम म्हणाले, सर्वच सदस्य मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत आग्रही आहे, विधिमंडळातही आमदारांनी याबाबत भूमिका वारंवार मांडली आहे. आपल्या मागण्या लेखी स्वरूपात द्याव्यात, विधिमंडळ अंदाज समितीच्या वतीने सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने त्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ, असेही कदम यांनी सांगितले. यावेळी समिती सदस्य आमदार राजेश काशीवार, रमेश बुंदिले, सकल ‘मराठा समाज’चे दिलीप देसाई, इंद्रजित सांवत, स्वप्निल पार्टे, वसंतराव मुळीक, सचिन तोडकर आदी उपस्थित होते.