Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Kolhapur › ग्रामविद्युत व्यवस्थापक निवडीकडे तरुणांची पाठ

ग्रामविद्युत व्यवस्थापक निवडीकडे तरुणांची पाठ

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 12:16AMशिरगाव : जोतिराम पाटील

गावामध्ये  उद्भवणार्‍या विजेच्या तक्रारींचे निराकरण तातडीने करण्यासाठी ग्रामविद्युत व्यवस्थापकांची निवड करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. ग्रामविकास विभागाने याबाबतचे आदेशही काढले. ग्रामपंचायतींनी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले. मात्र, गावागावांत या निवडीकडे तरुणांनी पाठ फिरवली आहे.

महावितरणकडे अद्याप एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. पुढील मार्गदर्शनच न मिळाल्याने निवड प्रक्रियेबाबतही गोंधळाचेच वातावरण आहे. विद्युत महावितरण कंपनीमार्फत ग्रामीण भागात कर्मचारी कार्यरत आहेत.

एका कर्मचार्‍यांची अनेक गावांसाठी निवड आहे. ग्रामीण भागात वीज वितरणाचे मोठे जाळे पसरले आहे. अनेक गावांचा भार एका वायरमनवर असल्याने काही बिघाड झाल्यास संबंधित कर्मचार्‍याला सेवा देताना अनेक अडचणी येतात, यामुळे ग्रामपंचायत स्तरावर विद्युतविषयक सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. यानुसार गावागावांत ग्रामविद्युत सहायकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

कंत्राटी पद्धतीने नियुक्‍ती केली जाणार्‍या या विद्युत सहायकांना प्रति ग्राहक नऊ रुपये किंवा तीन हजार यापैकी जास्त असणारी रक्‍कम मानधन म्हणून देण्यात येणार आहे. विद्युत महावितरण कंपनीकडून हे मानधन आदा करण्याचे निर्देश आहेत. मीटर रीडिंग घेणे, वीज बिल वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करून सप्लाय पूर्ववत करणे, डीओ फ्यूज टाकणे, फ्यूज कॉल तक्रार दूर करणे, रस्त्यावरील दिवाबत्ती देखभाल, बंद पडलेले दिवे बदलणे, नवीन वीजजोडणीची कामे करणे आदी कामांची जबाबदारी विद्युत व्यवस्थापकांवर सोपवण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयानंतर महिन्याभरातच ग्रामपंचायत स्तरावर इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले. काही गावांतील तरुणांनी आपले अर्ज संबंधित ग्रामपंचायतीकडे जमाही केले. यासाठी स्थानिक स्तरावर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावाही केला; परंतु अनेक गावांतील ही भरती पूर्णतः गोंधळात  सापडली आहे. महावितरण कार्यालयाने या भरतीसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती दिली.

कामाचे कौशल्य शिकवणार

महावितरण कंपनीमार्फत पुरवण्यात येणार्‍या सेवांसाठी ग्रामपंचायतींनी फ्रेन्चायझी काम करणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीकडून या कामासाठी ग्रामविद्युत व्यवस्थापकांची निवड करावयाची आहे. शासन आदेशामध्येही असे नमूद आहे. ग्रामपंचायतींनी निवड केलेल्या उमेदवाराला महावितरण कंपनी वीज वाहिनीवर काम करण्याचे कौशल्य शिकवणार आहे, तसेच पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.