Wed, Jul 17, 2019 18:36होमपेज › Kolhapur › बालवाडी,  अंगणवाडीत मिळणार ‘प्राथमिक’चे धडे

बालवाडी,  अंगणवाडीत मिळणार ‘प्राथमिक’चे धडे

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 12:21AMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

राज्य सरकारने बालवाड्या, अंगणवाड्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश आता प्राथमिक शिक्षणात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 4 हजार 100 अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना  प्राथमिक शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. यामुळे मुलांना अंगणवाडीपासून भाषा, गणित, चित्रकला, माती कला यासह अन्य विषयांची तोंडओळख होणार आहे. यासंदर्भात महिला आणि बालविकास खात्याने ‘आकार’ नावाचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांना वाचन, गाणी याचे अनौपचारिक पद्धतीने शिक्षण देण्यात येणार आहे. 

अंगणवाडी व बालवाडीतील शिक्षणाला पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा आहे. खर्‍या अर्थाने इथेच विद्यार्थ्यांना अक्षरओळख होते. हे शिक्षण अधिक प्रभावशाली करण्याबरोबरच त्याला ठोस कृतीची जोड देण्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाला आता प्राथमिक शिक्षणाचा दर्जा दिला आहे.

ग्रामीण भागातही सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा किंवा कॉन्व्हेंटस स्कूलमध्ये मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांचा आटापिटा चाललेला असतो. शहरी भागात तर बालवाडीला प्रवेश म्हणजे पालकांना एक  दिव्य पार पाडावे लागते. कारण ज्या बालवाडीत प्रवेश घेणार तिथे संबंधित मुलांच्या मुलाखती घेणे, मनमानी पद्धतीने प्रवेश शुल्क आणि डोनेशन अशा विविध प्रश्‍नांमुळे दरवर्षी बालवाडी प्रवेशप्रक्रिया ही चर्चेची आणि पालकांची चिंता वाढवणारी ठरत असते. 

बालवाडीत प्रवेश मिळाला नाही तर दाद मागण्यासाठी शासनाची यंत्रणा नसल्याने पालक हतबल होऊन जातात. यातून पालकांना न्याय मिळावा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कॉन्व्हेंटस स्कूल ही जी शैक्षणिक विभागणी दूर करून शिक्षणात समानता यावी, यासाठी राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रथमच पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश प्राथमिक शिक्षणात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. 

महिला आणि बाल विकास विभाग तसेच शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आकार’ नावाने अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यामध्ये  भाषा, गणित या विषयांची तोंडओळख व्हावी, वाचनातून आणि गाण्याच्या माध्यमातून मुलांना अक्षरांचे ज्ञान मिळावे, अशा पद्धतीने या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणातील असमानता दूर होऊन मुलांना खासगी असो किंवा सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा समान राहील, असे प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहेत.