Sat, Jul 20, 2019 13:24होमपेज › Kolhapur › शिक्षणाऐवजी ‘ते’ गिरवताहेत बालमजुरीचे धडे!

शिक्षणाऐवजी ‘ते’ गिरवताहेत बालमजुरीचे धडे!

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 11:18PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळा क्र. 1 ची इमारत 2011 च्या निर्लेखनानुसार धोकादायक ठरविल्याने या शाळा वर्गाचे स्थलांतर म्हसोबा माळ येथील प्राथमिक शाळेत करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा क्र. 1 मधील शालेय साहित्य हलविण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. परंतु, हे अवजड शालेय साहित्य चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून सुमारे 1 कि.मी. अंतरावरील शाळेत नेण्यात येत असल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत शिकविले जाते की बालमजुरीचे धडे दिले जातात, असा प्रश्‍न संतप्‍त पालकांतून उपस्थित केला जात आहे. 

गोकुळ शिरगाव प्राथमिक शाळा क्र. 1 ही शाळा बंद करण्यात येणार आहे. येथील वर्ग म्हसोबा माळ येथील शाळेत भरविण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील शैक्षणिक साहित्य हलविण्याचे काम मुख्याध्यापकांच्या आदेशानुसार सुरू आहे. पण, हे अवजड साहित्य  विद्यार्थ्यांकडून इतके ओझे उचलले जाईल का? याचा विचार न करता त्यांच्यावर ओझे लादण्याचा प्रकार शिक्षकांकडून होत आहे. एकीकडे दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असताना  दुसरीकडे  विद्यार्थी शाळा स्थलांतराचे ओझे वाहताना दिसत आहेत.  

शाळा व्यवस्थापन समितीनेही मुख्याध्यापकांना हे साहित्य वाहनातून हलविण्यास सांगितले होते, परंतु, मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीचे न ऐकता विद्यार्थ्यांवर ओझे लादण्याचा लाजीरवाणा प्रकार घडल्यामुळे पालकांतून संताप व्यक्त होत आहे. शैक्षणिक साहित्य हलविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायतीला दिली होती, पण त्यांनी ग्रा.पं.कडे वाहनाची मागणी केली नसल्याचे समोर येत आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक रजिस्टर, खुर्च्या, बेंच, इतर साहित्य डोक्यावरून न्यावे लागत आहे. मुलांना शाळेत शिकायला पाठवले की ओझी वाहायला? असा सवाल पालक करीत आहेत.  
याबाबत ग्रामसेवक एकनाथ सूर्यवंशी यांना विचारले असता, त्यांनी शालेय साहित्य हलविण्यात येणार आहे, असे मुख्याध्यापकांनी सांगितले होते. परंतु, त्यांनी साहित्य हलविण्यासाठी वाहनाची मागणी ग्रामपंचायतीकडे केली नव्हती. तसेच शालेय साहित्य विद्यार्थ्यांच्या डोेक्यावरून नेले जात असल्याची आपल्याला कल्पनाच नाही, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.