Mon, Jun 17, 2019 15:04होमपेज › Kolhapur › हजारो कुटुंबांच्या मालमत्ता गेल्या सावकारांच्या घशात

हजारो कुटुंबांच्या मालमत्ता गेल्या सावकारांच्या घशात

Published On: Feb 07 2018 2:22AM | Last Updated: Feb 07 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहर आणि परिसरातील हजारो गोरगरीब कुटुंबांच्या करोडो रुपयांच्या मालमत्ता खासगी सावकारांनी घशात घातल्याचे दिसून येत आहे. सावकारांनी बेकायदेशीर मार्गाने या मालमत्ता सरळ सरळ बळकावल्या आहेत. मात्र, सावकारांच्या दहशतीमुळे असे कर्जदार तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. त्यामुळे सावकारांच्या या मोगलाईविरुद्ध व्यापक मोहीम सुरू करण्याची गरज आहे.

खासगी सावकारी करणार्‍या बहुतेकांचा गोरगरिबांच्या मालमत्तेवर डोळा असलेला दिसतो. सावकारीच्या माध्यमातून संबंधितांची मालमत्ता हडपणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो. खासगी सावकारी करणारे अनेकजण कर्ज देताना संबंधित कर्जदाराकडून कोर्‍या स्टँपपेपरवर सह्या घेतात. जर कर्जदार ठराविक कालावधीत कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर त्याच स्टँप पेपरचा वापर करून कर्जदाराची जी काही मालमत्ता असेल ती सावकाराच्या नावे लिहून घेतली जाते. अनेकवेळा कर्जदाराने ठरलेल्या व्याजदराने आणि ठरलेल्या कालावधीत कर्जाची परतफेड केली तरी व्याजावर व्याज, दंडव्याज आदी कारणे सांगून कर्जाचा आकडा फुगवत ठेवला जातो. एकदा का हा आकडा कर्जदाराच्या परतफेड करण्याच्या आवाक्याबाहेर गेला की सावकारांची पहिली धाड कर्जदारांच्या मालमत्तांवर पडते आणि कर्जदाराला, त्याच्या कुटुंबीयांना दमदाटी करून, दहशत माजवून त्याची मालमत्ता सावकारांच्या नावे लिहून घेतली जाते किंवा अन्य कुणाला तरी विकायला भाग पाडले जाते. सावकारांच्या सांगण्यावरून मातीमोल भावाने गोरगरिबांच्या मालमत्तांचा सौदा करणार्‍या काही टोळ्याही ठिकठिकाणी सक्रिय असल्याच्या दिसून येतात.

सावकारांच्या नादाला लागून शेतीवाडी, राहते घर-जागा, रिकामे प्लॉट गमावून बसणार्‍यांची संख्या काही हजारात आहे. केवळ सावकारी पाशात अडकल्यामुळे सुखी संसाराची राखरांगोळी करून घेतलेलीही शेकडो कुटुंबे बघायला मिळतात. त्याशिवाय सावकारांच्या दहशतीमुळे आपल्या मालमत्तांवर पाणी सोडून परागंदा झालेलीही अनेक कुटुंबे दिसून येतात. सावकारी पाशात अडकलेल्या काही नोकर-चाकर मंडळींनी तर सावकारांच्या तगाद्यामुळे आणि त्यांच्या दहशतीमुळे नोकरी-धंद्यावर लाथ मारून पलायन केल्याच्याही काही घटना आढळून येतात. जिल्ह्यातील सावकारीचे हे भयावह रूप विचारात घेता जिल्ह्याच्या समाजस्वास्थ्याला लागलेली सावकारी ही एक भयंकर कीड आहे, असे समजण्यास हरकत नाही. त्यामुळे या किडीचा समूळ नाश करण्यासाठी आता एखादी सर्वव्यापी मोहीमच सुरू करण्याची आवश्यकता आहे.