Wed, Nov 21, 2018 19:56होमपेज › Kolhapur › कर्जदारांच्या ‘इभ्रतीलाही’ सावकारांचा पाशवी डोळा!

कर्जदारांच्या ‘इभ्रतीलाही’ सावकारांचा पाशवी डोळा!

Published On: Feb 08 2018 1:45AM | Last Updated: Feb 08 2018 12:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

खासगी सावकारांकडून केवळ कर्जदारांच्या मालमत्ताच हडप केल्या जातात, असे नाही तर अनेक सावकार आपल्या पाशवी बळाच्या जोरावर गोरगरीब कर्जदारांच्या ‘इभ्रतीवर’ हात टाकायलाही कमी करीत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून सावकारी पाशात अडकलेल्या अनेक गोरगरीब कुटुंबातील बाया-बापड्या आज भयभीत आयुष्य जगताना दिसत आहेत. त्यामुळे कठोर निर्धाराने या सावकारांचा उद्दामपणा चिरडून टाकण्याची आवश्यकता आहे.

मुळातच खासगी सावकारी पाशात अडकलेली बहुतांश कुटुंबे ही एकतर सर्वसामान्य किंवा गोरगरीब असतात. आपल्या अडी-अडचणीला बँका-पतसंस्था कर्ज देत नसतानासुद्धा सावकाराने आपणाला कर्ज दिल्याबद्दल या लोकांच्या मनात सावकाराबद्दल एक प्रकारची  उपकाराची भावना असते किंवा सावकार मंडळी त्यांना आपण त्यांच्यावर उपकार केल्यासारखी वागणूक देत असतात. शिवाय जोडीला कर्जवसुलीसाठी सावकाराचा धाक-दपटशा आणि गंडागर्दी ही ठरलेलीच असते. अशावेळी कर्जदारांच्या घरी एखादी तरणीताठी आणि सुंदर गृहिणी असेल तर या सावकारांची आणि त्याच्या वसुलीदारांची नियत फिरायला वेळ लागत नाही. कर्जाच्या आणि व्याजाच्या वसुलीच्या निमित्ताने कधी गोडी-गुलाबीने तर कधी दहशतीने अशा कर्जदार कुटुंबातील महिलेला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सावकार आणि त्याच्या टोळक्याकडून होत असलेले अनेक प्रकार लोकांच्या कानावर आहेत. मात्र, सावकार आणि कर्जदारांमधील हा ‘आपसका मामला’ असल्यामुळे समाजातून सहसा याविरुद्ध आवाज उठताना दिसत नाही. त्याचबरोबर सावकारांच्या दहशतीमुळेही कुणी त्याविरुद्ध बोलताना दिसत नाही.

खासगी सावकारी करणार्‍या अनेक सावकारांची नियत इतकी खराब असलेली दिसते की एकवेळ कर्ज आणि व्याज बुडले तरी चालेल; पण काहीही करून त्या कर्जदाराच्या ‘इभ्रतीवर’ हात मारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असलेले दिसतात. त्याचा परिणाम म्हणून अशा कर्जदारांच्या घरातील महिलांना रात्रंदिवस भयभीत वातावरणात रहावे लागते. तशातच कर्जदार जर थकबाकीदार झाला असेल, त्याच्याकडून कर्जाचा अथवा व्याजाचा हप्ता चुकला असेल किंवा सावकाराच्या भीतीने तो जर लपून छपून राहात असेल तर अशा कर्जदार कुटुंबातील महिलांच्या सावकारांकडून होणार्‍या छळाला पारावारच राहात नाही. घरचा कर्ता पुरुषच कर्जाच्या रूपाने सावकारांचा मिंधा झाल्यामुळे त्याच्याकडूनही सहसा सावकारांच्या या प्रकारच्या पाशवी अत्याचाराला विरोध होत नाही. त्यामुळे सावकार उद्दाम होताना दिसत आहेत.

गिधाडांच्या घिरट्या!

कर्जाचा साप्ताहिक किंवा मासिक हप्ता जसा ठरला असेल, त्याप्रमाणे सावकार मंडळी अनेकवेळा वसुलीसाठी कर्जदारांच्या घरी जातात. मात्र, कर्जदाराच्या घरी तरण्याताठी पोरीबाळी किंवा पत्नी असेल तर सावकार आणि त्याच्या टोळक्यांच्या अशा कर्जदारांच्या घरी रात्री-अपरात्री, कारण-विनाकारण कधीही फेर्‍या सुरू होतात. मेलेल्या जनावराभोवती घिरट्या घालणारी गिधाडं आणि ही सावकारी गिधाडं यांच्या प्रवृत्तीत कोणताही फरक दिसून येत नाही.