Wed, Jun 26, 2019 23:31होमपेज › Kolhapur › सावकारांच्या तगाद्याने आत्महत्येचा प्रयत्न

सावकारांच्या तगाद्याने आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 12:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून पाचगाव येथील टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पाचगावच्या तीन सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भिकाजी दिनकर सुर्वे, संतोष सकटे (दोघे रा. पाचगाव), सूरज सातपुते (रा. आर. के. नगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत प्रियांका राजू भालकर (वय 23, रा. पाचगाव) यांनी फिर्याद दिली. 

पाचगावात राहणारे राजू भालकर यांनी 2013 मध्ये सावकारांकडून दहा टक्के व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. 2016 पर्यंत वेळोवेळी व्याज व मुद्दल परत करूनही सावकारांकडून जादा व्याजाची मागणी होऊ लागली होती. संशयितांनी दमदाटी व मारहाण करून भालकर यांची टेम्पो ट्रॅव्हलर स्वत:च्या नावावर करून देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी पाचगावातील घरासमोरून ट्रॅव्हलर ओढून नेली.

सावकाराचे व्याज भागविण्यासाठी पैसे नसल्याने भालकर यांच्यावर स्वत:चे राहते घर विकण्याची वेळ आली. यानंतरही सावकारांनी छळ सुरूच ठेवला. याच नैराश्येतून राजू भालकर यांनी 24 एप्रिलला वडगावच्या हद्दीत घुणकी गावानजीक विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसर्‍याचा आश्रय...

राजू भालकर पत्नी आणि दोन मुलांसोबत पाचगावमध्ये राहण्यास होते. खासगी सावकारांच्या जाचामुळे त्यांना स्वत:चे घर सोडावे लागले. सध्या त्यांचे कुटुंब पत्नीच्या माहेरी राहण्यास आहे. राजू भालकर यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.