Fri, Apr 26, 2019 16:04होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू महाराज यांचे राष्ट्रीय एकात्मतेच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे योगदान

राजर्षी शाहू महाराज यांचे राष्ट्रीय एकात्मतेच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे योगदान

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भारतीय राष्ट्र निर्माण व देशात समता प्रस्थापित होण्यासाठीजाती मोडल्या पाहिजेत, हा सिद्धांत राजर्षी शाहू महाराजांनी मांडला व त्याद‍ृष्टीने कृती केली. त्यांनी उभारलेल्या विविध जाती-धर्माच्या वसतिगृहातून भारतीय मानसिकता असलेले विद्यार्थी तयार झाले हे शाहू महाराजांचे राष्ट्रीय एकात्मतेेच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील यांनी केले. 

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांच्या 96 व्या पुण्यतिथीनिमित्त  ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. डॉ. पाटील म्हणाले, इंग्रजांचे राज्य आल्यावर शिक्षणाचा अधिकार मिळाला. त्यानंतर मुंबई, कोलकाता येथे विद्यापीठे सुरू झाली. शाहू महाराज तत्कालीन परिस्थितीत वेदोक्‍त प्रकरणाशी अभूतपूर्व लढा देऊन जिंकले. वेदोक्‍त प्रकरणानंतर त्यांचा एकही दिवस सुखाचा गेला नाही. 

सर्व समान आहेत ही जाणीव झाल्यावर त्यांनी शिक्षणासह विविध कायदे केले. जातीनिहाय वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे प्रशिक्षण दिले. त्यामधील बहुतांश विद्यार्थ्यांनी सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले आहे. शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला. शिवचरित्र लिहायला लावून ते जगभर पोहोचविले, हे शाहू महाराजांचे राष्ट्रीय एकात्मतेच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे कार्य आहे. यावेळी ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे, प्रा. डॉ. अशोक चौसाळकर आदी उपस्थित होते. डॉ. सुरेश शिखरे यांनी आभार मानले.