Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Kolhapur › परदेशात शिकताना...

परदेशात शिकताना...

Published On: May 29 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 10:31PMउच्च शिक्षणासाठी परदेशात जाणे ही बाब आता नवीन राहिली नाही. भारतीयांना नेहमीच परदेशी शिक्षणाचे आकर्षण राहिले आहे. काही मंडळी परदेशात शिक्षण घेऊन भारतात येतात, तर काही जण परदेशातच स्थायिक होतात. परदेशातील शिक्षण म्हणजे पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागते. चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घ्यायचे म्हटले, तर त्याची फीदेखील आपल्या कल्पनेबाहेर असते. त्यामुळे सर्वसामान्यांना परदेशी शिक्षण आवाक्यात राहावे यासाठी बँकांनी शिक्षण कर्जाची सोयही उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून आपले पाल्य परदेशात नामांकित शैक्षणिक संस्थात शिक्षण घेऊ शकतात. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील शिक्षण हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने शिष्यवृत्ती किंवा कर्ज याची जुळवाजुळव करत परदेशात जातात. शिक्षणासाठी खर्चाची सोय झाली असली, तर कधी कधी तेथे राहण्याचा, खाण्याचा खर्चही कल्पनेपेक्षा अधिक असतो.  

प्रत्येक खर्चासाठी पालकांना देशातून पैसा पाठवणे शक्य नसते किंवा काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे दैनदिंन खर्च भागवण्यासाठी काही वेळेस तात्पुरत्या नोकर्‍या कामाला येतात. काही शैक्षणिक संस्था कॅम्पस आवारातच विद्यार्थ्यांना काही तासांसाठी रोजगार उपलब्ध करून देतात, जेणेकरून विद्यार्थी आपला खर्च भागवू शकतील. जास्तीत जास्त आठवड्यात वीस तास काम करण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यातून काही प्रमाणात विद्यार्थी पैसा जमा करू शकतात. हा झाला एक मार्ग. याशिवाय अनेक असे पर्याय आहेत की त्यातून आपण स्वत: पैसा उभारू शकतो. परदेशात आर्थिक स्रोताचे मार्ग कोणते आहेत, हे माहिती करून घेणे गरजेचे आहे. पार्टटाइम जॉबे, शिष्यवृत्ती किंवा पर्यायी कर्ज यातून काही प्रमाणात खर्चाचा भार हलका करू शकतो. या पर्यायांबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेऊ.

Graduate Assistantship : आपल्याला पैशाची गरज आहे, असे आपण वैयक्‍तिकरीत्या संस्थेला किंवा विद्यापीठाला अर्ज करू शकतो. या योजनेंतर्गत अनेक विद्यापीठ काही प्रमाणात ट्युशन फीची सोय करून देतात. त्याचप्रमाणे मासिक विद्यार्थी भत्ताही या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. यातून आपण राहण्याच्या खर्चाचा भार काही प्रमाणात उचलू शकतो. विद्यापीठातील प्रोफेसर किंवा उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना संशोधनात मदत केली, तर संस्था किंवा संबंधित व्यक्‍ती आपल्याला शुल्क देते.

Scholarship :  अनेक विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्था या हुशार, गरजू आणि चांगले मार्क मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असतात. या शिष्यवृत्तीचे स्वरूप वेगवेगळे असते. आपण कोणत्या शिष्यवृत्तीला पात्र ठरतो, हे पाहणे गरजेचे असते. ही शिष्यवृत्ती एका वर्षासाठी असू शकते किंवा तीन, पाच वर्षांसाठीही असू शकते. अध्यापनाच्या काळात जर आपल्याला चांगले गुण, ग्रेड मिळाला तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपण सुमारे 75 टक्क्यांपर्यंतची ट्युशन फी भरू शकतो. 

Alternative loans : जर तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल आणि कर्जाचा भार उचलण्याची क्षमता असेल, तर कर्ज उचलू शकतो आणि हप्त्याच्या रूपातून त्याची परतफेड करू शकतो. काही बँका परदेशात राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी थेट कर्ज उपलब्ध करून देतात. तो परदेशस्थ नागरिक किंवा ग्रीन कार्ड होल्डर असेल आणि त्याच्या गॅरंटरची चांगली पार्श्‍वभूमी असेल, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाबरोबरच अन्य कर्जही उचलण्याची सोय उपलब्ध असते. बँकांच्या अटी आणि नियमांचे पालन केल्यास हे कर्ज आपल्याला सहज मिळू शकते. 

अपर्णा देवकर