Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Kolhapur › पाठ्यपुस्तकातील अवघड भाग आता घरीच शिका!

पाठ्यपुस्तकातील अवघड भाग आता घरीच शिका!

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 12:15AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

वर्गात शिकवलेला धडा, गणितामधील आकडेमोड वा इंग्रजी शब्द आठवत नाहीत म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. पाठ्यपुस्तकामधील न समजलेला अवघड, क्‍लिष्ट भाग ‘क्यूआर कोड’च्या मदतीने घरबसल्या शिकता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तणावपूर्ण न होता सहज व आनंददायी बनणार आहे.  

21 व्या शतकात सर्व क्षेत्रांत प्रचंड स्पर्धा वाढली आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांनी पुढाकार घेतला आहे. पारंपरिक शिक्षण बदलत चालले असून, स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढला आहे. बर्‍याचवेळा वर्गात शिकवलेले समजत नाही, लक्षात राहत नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जाते.

विद्या प्राधिकरणाने तंत्रस्नेही शिक्षकांच्या साह्याने अभिनव उपकम सुुरू केला आहे. ‘दीक्षा’ अ‍ॅप तयार केले आहे. शालेय अभ्यासक्रमातील पहिली ते दहावीपर्यंत प्रत्येक इयत्तेच्या विषयानुसार पाठ्यपुस्तकात पहिल्या व स्वाध्याय पानावर क्यूक रिस्पॉन्स कोड (क्यूआर कोड) देण्यात आला आहे. दीक्षा अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर कंटेट ओपन होतो. मोबाईलवर क्यूआर कोड स्कॅन केल्यावर लिंक ओपन होते. यात विद्यार्थ्यांना पाठावर आधारित सखोल माहिती व्हिडीओ, ऑडीओ, अ‍ॅनिमेशन व नकाशे, चित्रांच्या स्वरुपात पाहता, ऐकता येतात. पुस्तकामधील अवघड घटक किंवा संकल्पना वेगळ्या पद्धतीने बनविण्यात आल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांना सराव करता येऊ शकतो. वाचता न येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘रिड अलाँग’ गोष्टीचा यामध्ये वापर केला आहे. शैक्षणिक सत्रातील पहिल्या तीन महिन्यातील अभ्यासक्रमाच्या लिंक तयार करण्यात आल्या आहेत. उर्वरित लिंक तयार करण्याचे काम सुरू असल्याचे शिक्षकांनी सांगितले. 

दीक्षा अ‍ॅपमधील क्यूआर कोडमुळे शिकणे व शिकवणे रंजक बनले आहे. नव्या युगातील विद्यार्थी टेक्नोसॅव्ही आहेत. मोबाईलवर वेगळ्या प्रकारच्या गेम खेळण्यापेक्षा अभ्यास करण्यात गुंततील. याचा विद्यार्थ्यांना गुणवत्तावाढीसाठी फायदा होईल.
- सुरेंद टिके, तंत्रस्नेही शिक्षक, भारतभूषण विद्यालय, चंबुखडी