Thu, Apr 25, 2019 03:35होमपेज › Kolhapur › शिंगणापूर बंधार्‍याला गळती

शिंगणापूर बंधार्‍याला गळती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कसबा बावडा : प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिंगणापूर बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. सहाशे क्युसेक्स पाण्याचा अपव्यय होत असल्याची पाटबंधारे (जलसंपदा) विभागाची माहिती आहे. त्यामुळे राधानगरी, काळम्मावाडी धरणातील पाणी साठ्यावर परिणामाची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी शिंगणापूर पाणी योजना सुरू करण्यात आली. यासाठी शिंगणापूर येथे नदीवर बंधारा बांधण्यात आला. यामध्ये पाणी अडविण्यात येते, पुढे उपसा केंद्रातून पाणी उपसा करून शुद्धीकरण केल्यानंतर शहरातील बहुतांश भागाला पुरविले जाते. गत पावसाळ्यानंतर शिंगणापूर बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. याबाबत पाटबंधारे (जलसंपदा) विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेला वेळोवेळी कळविले आहे. पण, महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग याबाबत असंवेदनशील असल्याचे स्पष्ट होत आहे. बंधार्‍यामधून होणारी पाणी गळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.

राधानगरी धरणापासून शिरोळपर्यंत एकूण 14 बंधारे आहेत. यातील 7 बंधारे शिंगणापूर बंधार्‍यापूर्वी आहेत. हे सर्व बंधारे भरून घेेण्यासाठी दर 21 दिवसांतून राधानगरीतून पाणी सोडण्यात येते. यानंतर 400 क्युसेक्स पाणी पंचगंगेत सतत सोडले जाते. शिंगणापूर बंधार्‍यातून पाणी गळतीमुळे सतत सोडण्यात येणारे पाणी 1200 क्युसेक्सपर्यंत वाढले आहे. कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा अखंड सुरू रहावा यासाठी शिंगणापूर बंधार्‍याची पाणीपातळी 534 मीटरच्या वर सतत ठेवावी लागते. शिंगणापूर बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात गळती असल्याने 600 क्युसेक्स पाण्याचा अपव्यय होत असल्याचे पाटबंधारे (जलसंपदा) विभागाने सांगितले.

शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने कर्मचारी सुमोतून वाळूची पोती वाहतूक करत पाणीगळती थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. शिंगणापूर बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने राधानगरी धरणातून सतत पाणी सोडावे लागते. गळती बंद करण्याबाबत पाटबंधारे (जलसंपदा) विभागने महानगरपालिकेला लेखी कळविले आहे. शुक्रवार, शनिवार पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांनी शिंगणापूर बंधार्‍याला भेट देऊन सूचना केल्या आहेत. महापालिका जलअभियंता यांना पाटबंधारे विभागाने बंधार्‍यापूर्वी मातीचा बांध घालून दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे. यावर महानगरपालिका कोणती कार्यवाही करते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कोल्हापूर शहराची 2011 च्या जनगणनेनुसार साडेपाच लाख लोकसंख्या आहे. प्रचलित नियमानुसार माणसी पाण्याची गरज 135 लिटर आहे. गळतीचा  विचार करता मानसी 150 लिटर पाण्याची आवश्यक आहे. म्हणजे दररोज सुमारे 80 ते 85 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना उपसा मात्र जवळपास दुप्पट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाण, यासाठी होणारा विद्युत, वितरण खर्च हा अधिकच आहे.

Tags : kolhapur Shinganapur bund  


  •