Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Kolhapur › दरोडेखोर टोळीचा फरारी म्होरक्या जेरबंद

दरोडेखोर टोळीचा फरारी म्होरक्या जेरबंद

Published On: Aug 30 2018 1:18AM | Last Updated: Aug 30 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बीड पोलिसांना हिसडा देऊन हातातील बेड्यासह धूम ठोकलेल्या आणि मराठवाडा, विदर्भात प्रचंड दहशत असलेल्या कुख्यात दरोडेखोर टोळीच्या म्होरक्याला येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणने सांगली फाट्यावर थरारक पाठलाग करून अटक केली. विलास महादेव बडे (वय 26, रा. चाटगाव, ता. माजलगाव, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. पुण्यासह अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात दोन डझनावर गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. ‘मोका’अंतर्गत अटक झालेली असताना त्याने पोलिसांना हिसडा देऊन पलायन केले होते.

बडे याचे उचगाव (ता.करवीर) येथील मणेरमळा, पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा, तसेच कर्नाटकातील मुधोळ (जि. बागलकोट) जिल्ह्यात वास्तव्य होते, अशी माहिती निष्पन्‍न झाली आहे. संशयिताने स्थानिक गुंडांना हाताशी धरून पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटकात गुन्हे केले असावेत, असा संशय पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी व्यक्‍त केला. 

दोन डझनावर गंभीर गुन्हे
भरदिवसा दरोड्यासह जबरी चोरी, ठकबाजीसह महामार्गावर निमआराम बस, आलिशान वाहने रोखून लूटमारी करणार्‍या बडे याच्या टोळीविरुद्ध मराठवाडा, विदर्भासह पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. बीड पोलिसांनी 2017 मध्ये टोळीचा छडा लावून म्होरक्या विलास बडे, त्याचा भाऊ गणेश बडे, बाळू पवारसह एका महिला साथीदाराला बेड्या ठोकल्या होत्या.

बडे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगाही उगारण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये धारूर (जि. बीड) पोलिसांनी चौकशीसाठी म्होरक्यासह साथीदारांना ताब्यात घेतले होते. मात्र, अधिकार्‍यासह पोलिसांना हिसडा देऊन विलास बडे बेड्यासह पसार झाला होता. त्याच्या अटकेसाठी महाराष्ट्र, कर्नाटकासह अन्य राज्यात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.

मणेरमळ्यात वास्तव्य
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सुनील इंगवले यांच्यासह सुनील कवळेकर, ओंकार परब, राम कांबळे, राजू आडूरकर यांना फरारी बडे याच्या वास्तव्याचा सुगावा लागला. उचगाव येथील मणेर मळ्यात पत्नी, दोन मुलांसह त्याचे वास्तव्य असल्याची खात्री झाली. पोलिसांनी सापळा रचला. पोलिस मागावर असतानाच  त्याने वास्तव्याचे ठिकाण बदलले. कर्नाटकातील मुधोळ येथे काही दिवस ठाण मांडले.

पलायनाचा केला बेत
रविवारी पहाटेच्या सुमाराला संशयित उचगाव येथील खोलीवर आला. अगदी थोडा वेळ थांबून त्याने तेथून पलायनाचा बेत केला होता. घाईघाईत त्याने पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा गाठला. पहाटेची वेळ असल्याने फाट्यावर एस.टी. बसच्या प्रतीक्षेत तो थांबला होता. संशय येऊ नये, म्हणून त्याने अन्य प्रवाशांच्या मागे दडण्याचा प्रयत्न केला. पोलिस पथकाने पाठलाग करीत चारही बाजूने सापळा रचला. पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच त्याने महामार्गावरून पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी महामार्गावर पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. शरीराने धडधाकट, उंचापुर्‍या संशयिताने त्यातूनही पोलिसांना हिसडा देण्याचा प्रयत्न केला.

पोलिस अधीक्षकांनी केली चौकशी
पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी स्वत: संशयिताकडे चौकशी केली. टोळीने कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात गंभीर गुन्हे केले असावेत का? याच्या चौकशीच्या सूचनाही  त्यांनी पोलिस निरीक्षक सावंत यांना दिल्या.

संशयितासह पथक बीडकडे 
टोळीच्या म्होरक्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच, बीड येथील अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक येथे दाखल झाले आहे. पथकाने सकाळी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने दाद लागू दिली नाही. सायंकाळी संशयिताचा ताबा घेऊन पथक बीडला रवाना झाल्याचे सावंत यांनी सांगितले.