Wed, Jul 24, 2019 14:45होमपेज › Kolhapur › ...तरच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते : देशमुख 

...तरच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते : देशमुख 

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 06 2018 11:37PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जीवनामध्ये विज्ञानविषयक दृष्टिकोन तयार होताना जगणे आणि लिहिणे यामध्ये अंतर नसावे. जगण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक झाला तरच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, असे प्रतिपादन 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी  मंगळवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि मुंबई येथील मराठी विज्ञान परिषद  यांच्या वतीने  रामानुजन सभागृहामध्ये आयोजित तीन दिवसीय मराठी विज्ञानकथा लेखन कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात  देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी  प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के होते.

देशमुख  म्हणाले, नवोदित लेखकांनी विज्ञाननिष्ठ कथा लेखनाचा सातत्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. भारतामध्ये 22 राजभाषा आहेत. भाषेचे राजकारण आहे. इंग्रजीचा प्रभाव आहे. भाषिक गुंतागुंत आहे. हे पाहता विज्ञानाची भाषा वाढली पाहिजे. यासाठी आवश्यक प्रयत्न होणे गरजेचे आहे. विज्ञानाने आपले आयुष्य व्यापून ठेवलेले आहे. मानवी जीवन प्रभावित करून टाकलेले आहे.  प्रतिभासंपन्न वैज्ञानिक शोधांंमुळे मानवी जीवन आनंदी व सुखकर बनले आहे. 

डॉ. शिर्के म्हणाले, नवोदित लेखकांना विज्ञानामधील तंत्रज्ञानाचे मराठीमधून लेखन करण्याची अमाप संधी उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगल्भ होणे गरजेचे आहे. प्रत्येकजण विज्ञाननिष्ठता पाळणारा एक भारतीय नागरिक होणे आवश्यक आहे. 

यावेळी अ.पां.देशपांडे यांनी  मनोगत व्यक्त केले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, शिवाजीराव पवार, यशवंत देशपांडे, माधुरी शानभाग, स्मिता पोतनीस, शिरीष देशपांडे आदींसह नवोदित विज्ञानकथा लेखक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.