Tue, Mar 19, 2019 20:25होमपेज › Kolhapur › आंदोलनात वकीलही सहभागी होणार

आंदोलनात वकीलही सहभागी होणार

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या वतीने सोमवारी दि.30 रोजी होणार्‍या ठिय्या आंदोलनात शहर, जिल्ह्यातील साडेतीन हजारांवर वकील सहभागी होणार आहेत. शहरातील दसरा चौक तसेच तालुक्याच्या ठिकाणीही आंदोलन होणार आहे.

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सरकारकडून प्रलंबित आहे. न्यायिक अडचणीमुळे आरक्षणास विलंब होत असल्याचे सांगितले जात असले तरी सरकारकडून त्याचा योग्य पाठपुरावा केला जात नसल्याचे चित्र आहे.

आरक्षणाच्या लढ्यात काही न्यायप्रविष्ट प्रश्‍न उपस्थित होत असतील तर, त्याची सोडवणूक करण्यासाठी बार असोसिएशन व खंडपीठ कृती समिती पाठीशी राहील, असेही अ‍ॅड. चिटणीस यांनी स्पष्ट केले. 
येत्या सोमवारी जिल्हा बार असोसिएशनमार्फत येथील दसरा चौकात तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वकिलांचे ठिय्या आंदोलन होणार आहे. 

बार असोसिएशन पदाधिकार्‍यांसह ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. महादेव आडगुळे, धनंजय पठाडे, विवेक घाटगे, डी. बी. भोसले, विवेक घाटगे, एस. पी. पाटील-शिरोळकर, संतपतराव पवार, प्रकाश मोरे, दीपक पाटील, अशोक पाटील,  शिवाजीराव राणे, अजित भोसले, आर. एल. चव्हाण, रमेश कुलकर्णी, व्ही. एम. पाटील, प्रकाश आंबेकर, ए. पी. पवार, गिरीश नाईक, अजित मोहिते आदी ज्येष्ठ विधिज्ञ सहभागी होणार आहेत. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या काळात ठिय्या आंदोलन होणार आहे, असेही ते म्हणाले.