Thu, Aug 22, 2019 13:12होमपेज › Kolhapur › साखर जप्‍ती कारवाई कायद्याच्या कचाट्यात

साखर जप्‍ती कारवाई कायद्याच्या कचाट्यात

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उत्पादकांची देणी थकवली  म्हणून एफआरपीच्या कायद्यानुसार साखर जप्‍तीचे आदेश साखर आयुक्‍तांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना काढले आहेत; पण जप्‍त होणारी साखर राज्य व जिल्हा बँकेकडे तारण म्हणून असल्याने तारण माल जप्‍त करता येत नसल्याचे दुसरा कायदा सांगतो. कायद्याच्या या कचाट्यामुळे साखर जप्‍ती हा निव्वळ फार्सच ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. ऊस उत्पादकांना देय असलेली एफआरपी थकवल्याबद्दल ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी केलेल्या पाठपुराव्यांनंतर साखर आयुक्‍तांनी जिल्हाधिकार्‍यांना साखर जप्‍तीचे आदेश काढले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी करवीर, पन्हाळा व हातकणंगले तहसीलदारांना नोटिसा पाठवून भोगावती, वारणा, पंचगंगा या कारखान्यांची साखर जप्‍त करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारपासून जप्‍तीची कार्यवाही सुरू झाली; पण हे करताना कायद्याचाच अडथळा आल्याने पहिल्या दिवशी जप्‍ती होऊ शकली नाही. 

‘वारणा’ 115 कोटी, ‘पंचगंगा’ 62 कोटी, ‘भोगावती’ 51 कोटी थकीत एफआरपी आहे. यापैकी ‘वारणा’ व ‘पंचगंगा’ या कारखान्यांवर राज्य बँकेचे, तर ‘भोगावती’वर जिल्हा बँकेचे साखर तारण कर्ज आहे. त्यामुळे जप्‍तीच्या कायद्यानुसार ज्याचा बोजा सर्वप्रथम असेल त्याचा त्यावर अधिकार असतो. या नियमानुसार या तीन कारखान्यांची साखर जप्‍त करायची म्हटल्यास राज्य व जिल्हा बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. मध्यंतरी दौलत कारखाना साखर जप्‍तीच्या प्रकरणावरून असाच तिढा निर्माण झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयानेही बँकेचा अधिकार मान्य करत जप्‍त केलेली साखर तारण कर्जासाठी भरणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दौलत कारखान्याच्या याच निकालाचा आधार घेऊन आताही या बँकांनी तहसीलदारांनी साखर जप्‍त करू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात तहसीलदारांशी संपर्क साधला असता त्यांनीही अशाप्रकारे साखर जप्‍त करता येत नाही; पण वरिष्ठांच्या आदेशाचे पालन म्हणून कारवाई सुरू करणार आहोत. बँकेने स्थगिती आणेपर्यंत ही जप्‍तीची कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

भोगावती कारखान्याचे जिल्हा बँकेला पत्र 

भोगावती कारखान्याने थकीत एफआरपीची रक्‍कम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा बँकेकडे तसे त्यांनी लेखी कळवले आहे.

Tags : Kolhapur, Law, enforcement, action, sugar, seizure