होमपेज › Kolhapur › इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेला प्रारंभ

इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेला प्रारंभ

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरात शनिवारपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेला प्रारंभ झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पेमेंट बँकेचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक ललित गांधी, कोल्हापूर विभागाचे डाक प्रवर अधीक्षक आय. डी. पाटील, शाखा प्रबंधक ए. जी. कांबळे आदी उपस्थित होते. रमणमळा येथील प्रधान डाक कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

प्रधान डाक कार्यालयाबरोबरच मार्केट यार्ड उपडाकघर, शुक्रवार पेठ उपडाकघर, उचगाव उपडाकघर आणि हेर्ले शाखा डाकघर येथील सेवा केंद्राचाही प्रारंभ लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला. संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी पेमेंट बँकेच्या 650 शाखांचा आणि 3 हजार 250 सेवा केंद्रांचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार झाला. याचे थेट प्रक्षेपण लोकांना प्रधान डाक कार्यालयात पहायला मिळाले.
प्रवर डाक अधीक्षक पाटील म्हणाले, इंडिया पोस्टने आपल्या तंत्रज्ञानाद्वारे सेवा सुधारित केली आहे. आतापर्यंत काऊंटर सर्व्हिसेसचे संगणकीकरण, मेल प्रोसेसिंग, ट्रान्समिशन, ई-कॉमर्स पार्सल प्रोसेसिंग कन्व्हेयर बेल्ट सिस्टीमसह आधुनिकीकरण पोस्टल लाईफ इन्शुरन्स, पीओएसबी बँकिंग, एटीएम सेवांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.