Sun, May 26, 2019 20:38होमपेज › Kolhapur › अकरावी प्रवेश; अर्ज छाननी अंतिम टप्प्यात

अकरावी प्रवेश; अर्ज छाननी अंतिम टप्प्यात

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 06 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश अर्ज छाननी अंतिम टप्प्यात आली असून, सोमवार (दि.9) रोजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने शहरातील 33 कनिष्ठ महाविद्यालयांतील 13,500 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दि. 1 जूनपासून प्रवेश अर्ज छाननीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.5) प्रभारी शिक्षण उपसंचालक व केंद्रीय प्रवेश समिती पदाधिकार्‍यांनी बैठक झाली. यात विज्ञान आणि वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आले. दि. 10 ते 13 जुलै या कालावधीत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. त्यानंतर दि. 14 रोजी रिक्‍त राहिलेल्या जागेवर कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर एटीकेटीधारक विद्यार्थांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. कोल्हापूर शासकीय आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. दि. 5 ते 6 जुलै दरम्यान गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविण्याची मुदत आहे. दि. 10 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. दि. 11 ते 15 जुलै या कालावधीत पहिली प्रवेश फेरी होणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेंतर्गत शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यमांच्या 668 विद्यार्थ्यांचे अनुदानित, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात 60 ते 70 विद्यार्थी तुकडीप्रमाणे वाटप करण्यात आले आहे. विज्ञान शाखेसाठीच्या 500 विद्यार्थ्यांना अनुदानित, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्येकी दहा विद्यार्थीप्रमाणे सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांनी दिली.