Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलासाठी सपाटीकरण अंतिम टप्प्यात

पर्यायी पुलासाठी सपाटीकरण अंतिम टप्प्यात

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम अखेर सोमवारी सुरू करण्यात आले असून, मंगळवारी कोल्हापूरकडील बाजूला जमीन सपाटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे काम पुरातत्त्व कायद्यामुळे रखडले आहे. पुलाचे सुमारे 20 टक्के बांधकाम शिल्लक राहिले आहे. त्याकरिता पुरातत्त्व कायद्यात बदल करण्यात आला आहे.  त्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. मात्र, ते राज्यसभेत अद्याप मंजूर न झाल्याने, पुलाच्या बांधकामासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रक्रियेला विलंब होत असल्याने सर्वपक्षीय कृती समितीने आक्रमक भूमिका घेत शिवाजी पुलावर भिंत बांधून तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर पर्यायी पुलाचे काम सुरू करण्यासाठी पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाल्यानंतर काम करण्याच्या अटीवर वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. या वर्कऑर्डरनुसार पहिल्या टप्प्यात जमीन सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.   

सोमवारी जेसीबीच्या साहाय्याने  हौदाचे बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत हौदाचे बहुतांश बांधकाम पाडण्यात आले. मंगळवारी सकाळी हौदाचे बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले. त्यानंतर या भागात खोदकाम सुरू करून जमीन सपाटीकरण करण्यात आले. या पाण्याच्या हौदासह तेथील झुडपे काढण्यात आली. जमीन सपाटीकरणास जेसीबी आणि मनुष्यबळाचा वापर करण्यात आला. सोमवारी झालेल्या आंदोलनामुळे पुन्हा काही प्रकार घडू नये म्हणून शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शिवाजी पुलानजीक सुरू असणार्‍या खोदकामाच्या ठिकाणी भेट दिली.  ठेकेदार बापू लाड यांच्याशी चर्चा करून सूचना केल्या. दरम्यान, कृती समितीचे आर. के. पोवार आणि बाबा पार्टे यांनी कार्यकर्त्यांसह खोदकामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाबाबत माहिती घेतली.