Thu, Apr 25, 2019 07:36होमपेज › Kolhapur › ‘तळीरामांच्या’ विमानाला भेसळीचं ‘इंधन’!

‘तळीरामांच्या’ विमानाला भेसळीचं ‘इंधन’!

Published On: Dec 02 2017 1:09AM | Last Updated: Dec 01 2017 11:58PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील कदम

मूळातच ‘तळीराम’ म्हणजे सदासर्वदा विमानात बसून हवेत तरंगणारी जमात. त्यांना असली काय आणि नकली काय, ‘किक’ बसल्याशी मतलब असतो. तळीरामांच्या या ‘बेसावधपणाचा’ नेमका फायदा उचलून आज जिल्ह्यात हुबळी मेड आणि बनावट देशी-विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्क खात्याचे त्याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्ह्यात जवळपास पाच महिने दारूबंदी होती. या दारूबंदीच्या काळातच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हुबळी मेड आणि बनावट दारूची कधी चोरीछुपे तर कधी खुलेआमपणे विक्री सुरू झाली होती. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या ब्रँडखाली जिल्ह्यातील अनेक धाबे आणि बंद पडलेल्या दारू दुकानांमधून सर्रासपणे ही बनावट दारू विकली जात होती. या हुबळी मेड दारूची कोणत्याही कंपनीच्या ब्रँडची एक क्‍वार्टर विके्रत्यांना साधारणत: 40 ते 50 रुपयांना मिळते. दारूबंदीच्या काळात हीच क्‍वार्टर जवळपास दोनशे रुपयांना विकून एका क्‍वार्टरमागे विक्रेते जवळपास 150 रुपये मिळवत होते.

आता बहुतेक गावांमधील दारूबंदी उठली असली तरी हुबळी मेड दारू विकून दाम दसपट पैसे मिळवण्याची चटक अनेक दारू विक्रेत्यांना लागून राहिलेली आहे. त्यामुळे दारू दुकाने सुरू होऊनसुद्धा अनेक दारू दुकानांमध्ये आणि बारमध्ये नामवंत कंपन्यांच्या ब्रँडच्या नावाखाली हुबळी मेड आणि बनावट दारूची विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. नामवंत कंपन्यांची साधारणत: 150 रुपयांची बाटली 160 रुपयांना विकून बाटलीमागे केवळ 10 रुपये मिळवण्याऐवजी 40 रुपयांची बनावट दारू 150 रुपयांना विकून एका बाटलीमागे जवळपास शंभर रुपये कमावण्याचा फंडा अनेक दारू दुकानांमध्ये राबविला जात आहे. 

प्रामुख्याने ग्रामीण भागातील काही बार आणि देशी दारू दुकानांमध्ये हा उद्योग सुरू असल्याचे दिसते. शहरी भागातील काही बारमध्येही या बनावट दारूची विक्री होताना दिसत आहे. ही बनावट दारू बाह्य रूपावरून किंवा बाटलीच्या आकारावरूनसुद्धा सहजासहजी ओळखू येत नाही. दररोज एकाच ब्रँडची दारू पिणार्‍याला मात्र ही दारू पिल्यानंतर लगेचच त्यातील बनावटगिरी ओळखता येते. एखाद्या गिर्‍हाईकाने ही बनावटगिरी ओळखली तर लगेच हुज्जत आणि काही वेळेस हाणामार्‍याही होतात. त्यामुळे अशा ‘दर्दी’ गिर्‍हाईकाला सहसा ही बनावट दारू दिली जात नाही. मात्र, मिळेल ती पिणारे किंवा कधीतरी पिणार्‍यांच्या गळ्यात ही बनावट दारू नेमकी मारली जाते.  अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या बनावट दारूचा रतीब घातला जात असल्याचे दिसत आहे.

पूर्वी बनावट किंवा हुबळी मेड दारू ही प्रामुख्याने कर्नाटकच्या सीमावर्ती भागातून आणि गोव्यातून येत होती. मात्र, अशी बनावट दारू बनविण्याचे तंत्र अवगत करून काहीजणांनी या जिल्ह्यातच ठिकठिकाणी हा ‘लघुउद्योग’ सुरू केल्याची चर्चा आहे. प्रामुख्याने मध्यरात्रीनंतर एखाद्या वाहनातून आवश्यक किंवा मागणी असलेल्या दारू दुकानांमध्ये या बनावट दारूचा ‘रतीब’ घातला जातो. गेल्या काही दिवसांपासून तर कोल्हापूर जिल्ह्यातील या बनावट दारूची आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये ‘निर्यात’ केली जाताना दिसत आहे. या प्रकारांना वेळीच अटकाव केला नाही तर बनावट दारूच्या बाबतीत अल्पावधीतच जिल्हा पूर्णपणे ‘स्वावलंबी’ झालेला दिसेल.