होमपेज › Kolhapur › वादळी पावसामुळे मोठे नुकसान

वादळी पावसामुळे मोठे नुकसान

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी झालेल्या जोरदार वादळी पावसाने मोठे नुकसान झाले. जोरदार वारे, विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने झाडे पडणे, घरावरील पत्रे उडून जाणे, तारा तुटणे असे प्रकार घडले.

तुळशी खोर्‍याला झोडपले

मांडरे : तुळशी खोर्‍याला दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. घरांची पत्र्याची छते, कौले वार्‍याने उडून गेली. गर्जनमधील चौदा घरांची छते उडून गेलीत. सावर्डे दुमाला गावाला वीजपुरवठा करणारी विद्युत डी. पी. कोसळली. विजेचे खांब पडले. मांडरे येथे उडून जाणारे छत पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणारा शेतकरी प्रसंगावधानामुळे वाचला. सडोली दुमाला, चाफोडी, गर्जन येथील घरांची छते उडून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले. सूर्यफूल, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले.

मांडरे येथील  ईश्‍वरा केरबा कपले  यांच्या गोठ्याचे छत उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. यात पाच जनावरे किरकोळ जखमी झाली. शिवाजी पाटील यांच्या राहत्या घराच्या छताचे पत्रे उडाले, आकुबाई पाडेकर यांच्या घराची कौले उडून गेली. याशिवाय किरकोळ पडझड झाली.सावर्डे दुमाला येथे  विद्युत डी. पी. च कोसळला.  सडोली दुमाला येथील पंडित विठोबा भाट यांच्या घराचे छत उडून गेले. गर्जन येथील पांडुरंग  नाईक, राजाराम  नाईक, शालाबाई  कांबळे, धर्मा  कांबळे, रेखा  नाईक, बापू  कांबळे, नामदेव  चव्हाण, धोंडिराम  चव्हाण, धनाजी  चव्हाण, सुरेश  चव्हाण, दादू  चव्हाण, संभाजी  चव्हाण, संदीप  चव्हाण यांच्या घरांचे पत्र्याचे छत उडून गेल्याने वादळाचा सर्वाधिक फटका गर्जन गावाला बसला आहे. चाफोडी येथील संजय कांबळे यांच्या घराचे पत्र्याचे छत उडून गेले.पिकांचेही नुकसान झाले.
म्हालसवडे परिसरात  पत्रे उडाले

म्हालसवडे : म्हालसवडे परिसरात दुपारी चारच्या सुमारास जोरदार वादळी वारे व गारांसह पडलेल्या पावसाने परिसरातील घरांचे, ऊस पिकाचे, मिरची, केळी पिकांचे, गुर्‍हाळ घरांचे, तसेच बडमींचे नुकसान झाले आहे. वादळामुळे विद्युत खांब कोसळल्याने वीज सेवाही खंडित झाली आहे. म्हालसवडे येथील अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून नुकसान झाल्याचे समजते. तसेच पाटेकरवाडी फाट्यावरील नितीन सदाशिव पाटील  यांच्या कापड दुकानावरील पत्रे उडून गेल्याने लाखो रुपयांची कपडे भिजून नुकसान झाले आहे. संकेश्‍वर मार्गावर झाडे कोसळली.

गडहिंग्लज : आज सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे गडहिंग्लज तालुक्यामध्ये काही ठिकाणी झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली. यामध्ये गडहिंग्लज संकेश्‍वर मार्गावर सुमारे 40 हून अधिक झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. निलजी परिसरामध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. याच सुमारास वादळी वारे वेगाने सुरू असल्याने या परिसरामधील झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली होती. स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावरील झाडे हटवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, गडहिंग्लज शहरामध्येही पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली होती. शहरामध्ये मात्र वारे नसल्याने पावसाची तीव्रता जाणवत नव्हती.