होमपेज › Kolhapur › पन्हाळ्याच्या पायथ्याशी भूस्खलन 

पन्हाळ्याच्या पायथ्याशी भूस्खलन 

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 26 2018 1:12AMपन्हाळा : प्रतिनिधी 

पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर येथील जमीन सपाटीकरणाच्या कामामुळे  गुरुवार पेठे येथील गट नंबर 102 आणि शेजारील मिळकतीत  भूस्खलन झाले. त्यामुळे बुधवारी पहाटे  येथील न्यू हायस्कूलच्या इमारतीचा पूर्व भाग कोसळला. परिणामी उर्वरित इमारत धोकादायक बनली आहे.

या घटनेनंतर  ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळीच दक्षता घेतल्याने जिवीतहानी टळली. प्रवीण शंकर यादव यांच्या मालकीच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. कुंभारवाडा येथील जमीन सपाटीकरणाच्या कामामुळे गुरुवार पेठेतील  घरांना भेगा पडल्याचे सांगण्यात आले. जमिनीस व घरांना पडलेल्या भेगा रुंदावत असल्याने परिसरात भूस्खलनाची मोठी शक्यता असल्याचा भूवैज्ञानिकांनी अहवाल दिला आहे. असे तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले.  गुरुवार पेठ येथील मोहिद्दीन महमूद काझी, मेहबूब महमूद काझी यांच्या घरांना मोठे तडे गेले आहेत.  ही घरे कोसळण्याच्या स्थितीत आहेत.काझी यांच्या घरांसह येथील दीपक दिनकर माणगावकर यांच्या घराकडे  जमिनीच्या भेगा सरकू लागल्याने भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.

तसेच मयुरी जीवन जाधव, प्रिया अविनाश जाधव व रश्मी प्रमोद बेडेकर, रंजना दिनकर सावेकर, अमेय दिनकर सावेकर व सुमन वसंतराव साळी यांच्या मिळकतींमध्ये मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पन्हाळा पंचायत समिती गट विकास अधिकारी शरद भोसले आणि पंचायत समिती सदस्य व प्रवक्‍ते अनिल कंदूरकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ग्रामसेवक ए. बी. धुमाळे यांनी या घटनेचा पंचनामा करून आपत्ती व्यवस्थापनेकडे अहवाल पाठविला आहे.

भूस्खलनाच्या घटनेनंतर पन्हाळा तहसील कार्यालय येथील व्यवस्थापन  कक्षात बैठक पार पडली. त्यावेळी प्रभारी तहसीलदार अनंत गुरव यांनी  या भागातील नागरिकांना ग्रामपंचायतीत नागरिकांना स्थलांतरित  करण्याचे आदेश देण्यात आले.  तसेच या लोकांना लागणारे धान्य उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. यावेळी आपटीचे पोलिस पाटील रघुनाथ बुचडे, नेबापूरचे पोलिस पाटील सोपान काशीद, सरपंच केदार उरणकर, दीपक माणगावकर, विश्‍वास मिरजे, गोरक्ष जमादार उपस्थित होते.