Wed, Mar 27, 2019 05:57होमपेज › Kolhapur › जोतिबा यात्रेसाठी लाखो भाविक दाखल

जोतिबा यात्रेसाठी लाखो भाविक दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

चैत्र पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि. 31) होणार्‍या यात्रेत दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविक शुक्रवारी जोतिबा डोंगरावर दाखल झाले. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून आलेल्या भाविकांमुळे पंचगंगा नदीघाट फुलून गेला होता. महापालिकेने फिरता दवाखाना, अग्‍निशमन दल, पाण्यातील बोट आणि त्यावर जवान अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एस.टी.ने सुरू केलेल्या पंचगंगा बस स्थानकावरून गुरुवारी सुमारे 75 पेक्षा अधिक बसेस सोडण्यात आल्या. शुक्रवारी एस.टी.च्या 125 फेर्‍या झाल्या. त्याशिवाय राज्यातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. कडक उन्हाची तमा न बाळगता लांबून आलेल्या  भाविकांचा ‘जोतिबाच्या नावानं चांगभल’, असा अखंड जयघोष सुरू आहे.

जोतिबा डोंगरावर शनिवारी पहाटे पाच ते सहा या वेळेत शासकीय अभिषेक होऊन जोतिबा यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी तीन राज्यातून शुक्रवारी दिवसभरात मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात दाखल झाले. बहुतांशी भाविक पंचगंगा नदीघाटावर येऊन अंघोळ करून तेथे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा आस्वाद घेऊन जोतिबा डोंगराकडे रवाना होत होते. मंडळाच्या वतीने शनिवारी दिवसभर महाप्रसाद आणि सकाळी नाष्टा अशी सोय करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने फिरता दवाखाना, अग्‍निशमन दल सज्ज

पंचगंगा नदीघाटावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने घाटावर आरोग्य पथकासह फिरता दवाखाना सज्ज ठेवण्यात आला आहे. अग्‍निशमन दलाच्या वतीने एक गाडी तसेच नदीच्या पाण्यात बोट तैनात ठेवण्यात आली आहे. या बोटीवरून भाविकांना पाण्याच्या खोलीबाबत सातत्याने सूचना देण्यात येत होत्या. महापालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, फिरते शौचालयही ठेवण्यात आले आहे. यात्रा काळात तीन दिवस घाटावर प्रखर झोताची विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.
एस.टी. प्रशासनाच्या वतीने यात्रा काळासाठी पंचगंगा बसस्थानकावरून दर पाच ते सात मिनिटांनी जोतिबा डोंगराकडे बसेस सोडण्यात येत आहे. गुरुवारी रात्री दहापर्यंत 75 पेक्षा अधिक फेर्‍या सोडण्यात आल्या. शुक्रवारी दिवसभरात सुमारे 125 हून अधिक बसेस सोडण्यात आल्या. जोतिबा डोंगर घाटामध्ये एस.टी.च्या बसला कोणतीही अडचण येऊन नये, जर एखाद्या बसला अडचण आल्यास त्या ठिकाणी तत्काळ यंत्रणा पोहचावी, यासाठी एस.टी.च्या वतीने घाटामध्ये यांत्रिक कर्मचार्‍यांचे पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे.

घाटात 40 अधिकारी,341 पोलिस कर्मचारी तैनात

केर्ली ते जोतिबा डोंगर या घाटमार्गावर 40 अधिकारी आणि 341 पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. चार पोलिस निरीक्षक, 27 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि 341 कर्मचारी यांचा यात समावेश आहे. घाटमार्गात वाहतुकीची कोंडी होणार्‍या ठिकाणी हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर फिरती गस्तीपथके, भरारी पथकेही कार्यरत ठेवण्यात आली आहेत.

मंदिराच्या आवारात 600 पोलिसांचा ताफा सज्ज

यात्रेच्या काळामध्ये मंदिर आवारात प्रचंड गर्दी असते. भाविक सासनकाठ्या नाचवत जात असताना कोणताही व्यत्यय येता कामा नये, यात्रा काळातील सर्व धार्मिक विधी अत्यंत शांततेत पार पडावेत, यासाठी जोतिबा मंदिराच्या आवारात अधिकार्‍यांसह सुमारे 600 पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक, एक अप्पर पोलिस अधीक्षक, चार पोलिस निरीक्षक, 13 सहायक पोलिस निरीक्षक, 40 पोलिस उपनिरीक्षक, 349 जवान, 176 महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. याशिवाय एसआरपीच्या दोन प्लॅटून, पोलिस मित्र आणि कोडोली पोलिस ठाण्याकडील सर्व पोलिस कर्मचारी या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.

टू-व्हीलर, फोर व्हीलर पंक्‍चर सर्व्हिस

यात्रेसाठी कोल्हापूर टायर वर्क्स संघटनेच्या वतीने केर्ली फाट्यावर शनिवारी भाविकांच्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांचे मोफत पंक्‍चर काढून देण्यात येणार आहे. सकाळी सहापासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे अनिल कोडोलीकर, सारंग साळोखे, सुभाष मोहिते, राजू मुजावर यांनी केले.

Tags :  Kolhapur, kolhapur News, Lakhs, devotees, Jyotiba Yatra


  •