Wed, Jul 17, 2019 12:49होमपेज › Kolhapur › सह्याद्रीच्या जंगलातून ‘लाजवंती’ची तस्करी!

सह्याद्रीच्या जंगलातून ‘लाजवंती’ची तस्करी!

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 09 2018 2:12AMकोल्हापूर : सुनील कदम

जगभर दुर्मिळातील दुर्मीळ समजल्या जाणार्‍या आणि देशात केवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळून येणार्‍या ‘लाजवंती’ (स्लेंडर लॉरिस) या वन्यप्राण्याची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याची बाब समोर आलेली आहे. परदेशात, तसेच देशांतर्गत काही भागात काळी जादू आणि अशाच काही अतार्किक कारणांसाठी याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे लाखो रुपयांच्या आमिषापोटी काही मंडळींनी चोरीछुपे हे उद्योग सुरू केले आहेत. या तस्करीला वेळीच चाप लावला नाही, तर हा दुर्मीळ वन्यप्राणी नामशेष होण्याचा धोका आहे.

 जगात फक्‍त भारत आणि श्रीलंका या दोनच  देशांत ‘लाजवंती’ या वन्यप्राण्याचे अस्तित्व आढळून येते. ‘स्लेंडर लॉरिस’ असे याचे शास्त्रीय नाव आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील चांदोली, राधानगरी, चंदगड, आजरा, आंबोली, दोडामार्ग भागातील घनदाट जंगलांमध्ये या प्राण्याचे अस्तित्व आढळून येते. हा प्राणी निशाचर असून, प्रामुख्याने तो उंच झाडांवर राहतो. अर्ध्या फुटापासून एक फुटापर्यंत याची उंची असते, तर वजन साधारणत: दोनशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत असते. त्याचप्रमाणे साधारणत: दहा ते पंधरा वर्षांपर्यंत याचे आयुष्यमान असते. या भागात आढळणार्‍या ‘लाजवंती’चा रंग करडा असतो,

मात्र डोळे लालभडक असतात. सात ते दहापर्यंतच्या संख्येने कळपाने राहणारा हा प्राणी असून कीटक, पाने, फुले, फळे हे त्याचे अन्न आहे. प्रामुख्याने झाडांच्या ढोल्यांमध्ये यांचा अधिवास असतो, तर क्वचितप्रसंगी ते झाडांची पाने व छोट्या फांद्यांपासून घरटीही बनवितात.

या प्राण्याबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अज्ञान आणि अंधश्रध्दा प्रचलीत आहेत. तो माणसासारखा दिसतो, माणसासारखा हसतो, माणसासारखा रडतो, तो माणसाचा छोटा अवतार आहे, तो झाडावरचा माणूस आहे, तो माणसासारखा लाजतो अशा कितीतरी अंध्दश्रधा आणि समज-गैरसमज लोकांमध्ये प्रचलीत आहेत.  त्याच्या मानवसदृष्य चेहर्‍यामुळे आणि मोठमोठ्या डोळ्यांमुळे तो लाजल्यासारखा भास होतो. मात्र तो जणूकाही खरोखरच लाजतो असे समजून स्थानिक लोकांनी त्याला लाजवंती हे नाव दिलेले आहे. सध्या या संपूर्ण भागात जवळपास एक हजार ते बाराशे लाजवंतीचे अस्तित्व असावे, असा वनखात्याचा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात या प्राण्यासाठी काही लाख रूपयेसुध्दा मिळतात. त्यामुळे या प्राण्यांच्या चोरट्या शिकारीला आणि तस्करीला चालना मिळताना दिसत आहे. वर्षाकाठी किमान शंभर-दिडशे लाजवंतीची या भागातून तस्करी होत असल्याचा अंदाज आहे.

 संरक्षण देण्याची गरज!

या दुर्मिळ प्राण्याचे  संरक्षण करण्यासाठी या प्राण्याबद्दल असलेल्या अंधश्रध्दा  दूर करण्याची गरज आहे. वन्यजीव कायद्यानवये लाजवंती ला संपूर्ण सुरक्षा प्रदान केली आहे.  त्यामुळे लाजवंतीची तस्करी हा गंभीर शिक्षपात्र गुन्हा असल्याची लोकांना जाणीव करून देण्याची गरज आहे.