Thu, Apr 25, 2019 16:01होमपेज › Kolhapur › मजुरीवाढ आंदोलनाची तीव्रता वाढवणार

मजुरीवाढ आंदोलनाची तीव्रता वाढवणार

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 07 2018 11:10PM

बुकमार्क करा
इचलकरंजी : प्रतिनिधी

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढप्रश्‍नी सुरू असलेल्या संपाला सात दिवसांचा कालावधी लोटला, तरी अद्याप याप्रश्‍नी कोणताही तोडगा निघालेला नाही. संप मागे घ्यावा, यासाठी प्रशासन आग्रही असले, तरी कामगार संघटना संप सुरूच ठेवण्यावर ठाम आहेत. सहायक कामगार आयुक्‍तांनी केलेली तीन पैशांची वाढ मान्य नसल्याने सोमवारपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दत्ता माने यांनी दिला.

यंत्रमाग कामगारांना कोल्हापूर येथे झालेल्या करारानुसार मजुरीवाढ मिळावी, यासाठी कामगार संघटना संयुक्‍त कृती समितीच्या वतीने 1 जानेवारीपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून सहायक कामगार आयुक्‍त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. प्रांत कार्यालयावर विविध कामगार संघटनांनी मोर्चे काढले होते. कामगार संघटना आणि यंत्रमागधारक संघटना यांच्यातील संघर्षाचा परिणाम वस्त्रोद्योगाला सहन करावा लागतो.

शिवाय, त्याचे पडसाद शहराच्या दैनंदिन कामकाजावर उमटतात, हे प्रशासनाला माहीत असूनही मजुरीवाढप्रश्‍नी सहायक कामगार आयुक्‍तांना गांभीर्य नसल्याची टीका कामगार नेत्यांनी केली. कामगारांच्या लढ्यात आयटक संघटना सहभागी असून, कामगारांच्या न्याय्य हक्‍कांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी त्यांनी दर्शविली. यावेळी आनंदा गुरव, मदन मुरगुडे, परशराम आगम, मारुती आजगेकर, धोंडिबा कुंभार, शिवानंद पाटील, सदा मलाबादे, ए. बी. पाटील, बंडोपंत सातपुते आदींची भाषणे झाली.